जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण
रत्नागिरी: कोरोना परिस्थितीत मागील दोन वर्षांत अनेक कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे. कोरोना निर्बध कमी करुन पूर्णवेळ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा प्रवेशापासून कोणतेही मुल वंचित राहू नये यासाठी जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
या विशेष उपक्रमासाठी दि. 5 जुलैपासून सुरुवात करण्यात आली असून ही मोहीम 20 जुलैपर्यंत असणार आहे. या कालावधीत वाडी, वस्ती, गाव शिवारात शाळा प्रवेशापासून वंचित असलेल्या मुलांचा शोध शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.
राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार तालुका स्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी हे या समितीचे सचिव म्हणून कामकाज पाहत आहेत.
शाळाबाह्य मुले आढळून आल्यास अशा मुलांना जवळच्या शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाकडून सर्व गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्याआहेत.