वन्य प्राण्यांकडून नुकसान झाल्यास मिळणार भरपाई
रत्नागिरी : शासनाच्या नव्या नियमावलीनुसार शेतीउपयुक्त साहित्य अथवा मालमत्ता आदींचे नुकसान प्राण्यांकडून झाल्यास त्याची भरपाई देण्यात येणार आहे. या बदलाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत. शासनाच्या नव्या नियमावलीनुसार शेती अवजारे आणि उपकरणे, बैलगाडी, संरक्षक भिंत, कुंपण व कौलारू किंवा पत्र्याचे घर, जनावरांचा गोठा, स्लॅबची इमारत आदींच्या नुकसानीची भरपाई देण्यात येणार आहे.
हिंस्त्र, जंगली प्राण्यांकडून शेतीची हानी केली जाते. त्याची भरपाई देण्यात येत होती. आता कृषी मालमत्तेचे नुकसान झाल्यास भरपाई देण्यात येणार आहे. यामध्येे हत्तीसारख्या प्राण्यामुळे होणारी हानीही गणण्यात येणार आहे. यामध्ये मालमत्तेचे नुकसान झाल्यास तीन दिवसात संबंधित वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी. ज्या साहित्याचे तसेच वस्तूंचे नुकसान झाले आहे, त्यांचा पंचनामा होईपर्यंत त्यांना आहे त्या जागेवरच ठेवावे. वनपरिक्षेत्र अधिकारी, सार्वजनिक बांधकामचे कनिष्ठ अभियंता तसेच तलाठी या सदस्यांकडून 14 दिवसांत पंचनामा करण्यात येईल. अहवाल सादर केला जाईल. अहवालानंतर चार दिवसांत किंवा 23 दिवसांत संबंधित शेतकर्याला आर्थिक मदत मिळेल. मात्र यात अतिक्रमणधारकाला तसेच वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेल्यांना भरपाई मिळणार नाही.
शेती अवजारे तसेच उपकरणांचे नुकसान झाल्यास त्या व्यक्तीला जास्तीत जास्त 5 हजार रुपये देण्यात येतील. बैलगाडीचे नुकसान झाल्यास संबंधित शेतकर्याला जास्तीत जास्त 5 हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळेल. संरक्षक भिंत, कुंपण यांचे नुकसान झाले तर जास्तीत जास्त 10 हजार रुपये देण्यात येतील. तर कौलारू घर, गोठा यांची नुकसानभरपाई म्हणून जास्तीत जास्त 50 हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळेल. विटा, स्लॅबची इमारत यांचे नुकसान झाल्यास जास्तीत जास्त 1 लाख रुपये देण्यात येणार आहे.