वीज तोडण्याच्या बनावट ‘एसएमएस’चे लोण राज्यभर;वीज ग्राहकांनी दक्षता बाळगण्याची गरज
‘गेल्या महिन्याचे वीजबिल भरले नसल्याने आपला वीजपुरवठा रात्री साडेनऊला तोडण्यात येणार आहे.
‘गेल्या महिन्याचे वीजबिल भरले नसल्याने आपला वीजपुरवठा रात्री साडेनऊला तोडण्यात येणार आहे. त्यामुळे सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा…’ अशा स्वरूपाचे बनावट ‘एसएमएस’ वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून पाठवून, तसेच एखादी लिंक किंवा प्रणाली उघडण्यास सांगून वीज ग्राहकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार आता राज्याच्या विविध भागांत घडू लागले आहेत. याबाबत सायबर विभागाकडे तक्रार दाखल असली, तरी चोरटे अद्याप मोकाट आहेत. महावितरणकडून वैयक्तिक क्रमांकावरून कोणालाही ‘एसएमएस’ पाठविले जात नाहीत. त्यामुळे त्याला प्रतिसाद न देण्याची दक्षता ग्राहकांनी घ्यायची आहे.
वीज तोडण्याचा संदेश वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून पाठविण्यात येत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. या संदेशानंतर ऑनलाइन वीजबिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून बनावट लिंक पाठविण्यात येत आहे. तसेच ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी संगणक प्रणाली डाऊनलोड करण्यास सांगितले जात आहे. ग्राहकांनी त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाइल किंवा संगणक हॅक करून बँक खात्यातील शिल्लक रक्कम लंपास करण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी असे बनावट संदेश व लिंककडे संपूर्णपणे दुर्लक्ष करावे, असे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.
www.konkantoday.com