फाइन आर्ट्सचे शिक्षण घेतलेल्या दोन तरुणींनी इकोफ्रेंडली साहित्यापासून दौलताबाद-शरणापूर फाटा रोडवर पाच टुमदार घरे उभारली
प्लॅस्टिकचा वाढता वापर आणि त्यापासून होणारा कचरा पर्यावरणासाठी दिवसेंदिवस घातक ठरतोय. मात्र, प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा योग्य पुनर्वापर करून अतिशय देखणा प्रयोग संभाजीनगरमधील दोन तरुणींनी केला आहे
.फाइन आर्टचे शिक्षण घेणाऱ्या कल्याणी भारंबे आणि नमिता कपाळे यांनी तब्बल 16 हजार टाकाऊ बॉटल्स, गाईचे शेण आणि 7 ट्रक्टर माती आदी इकोफ्रेंडली साहित्यापासून दौलताबाद-शरणापूर फाटा रोडवर पाच टुमदार घरे उभारली आहेत. त्यांच्या या हटके प्रयोगाची सर्वत्र चर्चा आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून एमएफएचे शिक्षण पूर्ण करणाऱया कल्याणी आणि नमिता यांनी लॉकडाऊनमध्ये आरो व्हिलेज सिटीचे यूटय़ूबवर व्हिडिओ पाहिले. तसेच, गुवाहाटी येथील विद्यार्थ्यांकडून शाळेच्या फीसऐवजी टाकाऊ बॉटल्स आणि कचऱ्यापासून बॉटल्स ब्रिक्स तयार करून घेतात हे पाहून असा प्रयोग आपल्या शहरात करता येऊ शकेल का, अशी कल्पना त्यांना सुचली. त्यांनी गुगलवर माहिती सर्च केली आणि त्यावर अधिक संशोधन केले. चार महिन्यांत विविध भागांतून 16 हजार बॉटल्स व कचरा जमा केल्या. त्यानंतर चार हजार चौरस फूट जागेत 31 बाय 11, 11 बाय 15, 20 बाय 20 आणि 20 बाय 22 आकारात घरासारखी गोलाकार कुटी उभारली.
या प्रकल्पाला त्यांनी ‘वावर’ असे नाव दिले आहे. तरुणींनी प्लॅस्टिकच्या रिकाम्या बॉटल्समध्ये कचरा भरून त्या हवाबंद केल्या. हजारो बॉटल्स जमा करून भिंतींची उभारणी केली. तिन्ही ऋतूंमध्ये त्यांनी घरांची यशस्वी चाचणी त्यांनी घेतली.
प्लॅस्टिक पर्यावरणासाठी घातक असून त्याचे विघटन होत नाही. त्यामुळे लोकांमध्ये प्लॅस्टिकच्या पुनर्वापराबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. घराचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता शहराच्या विविध भागात नागरिकांना बसण्यासाठी टाकाऊ प्लॅस्टिकपासून बाकडे तयार करण्याचा आमचा मानस आहे.
www.konkantoday.com