पावसाळ्यातील आपत्ती निवारणासाठी संगमेश्वर तालुका सज्ज

देवरूख : पावसाळ्यात येणार्‍या विविध आपत्तीचा सामना करण्यासाठी संगमेश्‍वर तालुका महसूल विभाग सामाजिक संस्थांची मदत घेत सज्ज होत आहे. यासाठीची नुकतीच आपत्ती निवारण बैठक झाली.
तहसीलदार सुहास थोरात यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडमी, निलेश चव्हाण व सहकारी तसेच पत्रकार यांची एकत्रित बैठक सोमवारी घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीत दोरी, लाईफबॉय, लाईफ जॅकेट, हेल्मेटची व्यवस्था व प्रथमोपचार पेटी आवश्यक असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी मांडले.
याचबरोबर प्रत्येक एसटीमध्ये कोयती, दोरी असावी व तालुक्याची बंद बोट सुरु करावी. तालुक्यातील सर्व मोबाईल टॉवरवरील वीजरोधक यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी केली. यावर केंद्र शासनाकडून आपत्ती निवारणासाठी येणारे साहित्य तालुक्यात सज्ज केले जाईल याचबरोबर सर्व मागण्यांवर लवकरच सकारात्मक कार्यवाही केली जाईल.
तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांना ओळखपत्र दिले जाईल या संस्थांना व शासकीय कर्मचारी यांना राजू काकडे अ‍ॅकॅडमीने प्रशिक्षीत करावे यासाठी अ‍ॅकॅडमीने मदतीची ग्वाही दिली. सर्व आपत्तींबाबत यात दरड पडणे, जमीन खचणे, झाडे पडणे याबाबत सविस्तर चर्चा करुन उपाययोजनांची तयारी करणे यासाठी माहिती देखील संकलित करण्यात आली. सराव निवारणाची यादी अद्ययावत करणे या सूचनेवर तहसीलदार यांनी त्वरित ही कारवाई केली जाणार असल्याचे नमूद केले.
यावेळी नीलेश चव्हाण, अण्णा बेर्डे, रंजना कदम, रेवा कदम, राजा गायकवाड यांसह सर्व सभासद व पत्रकार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button