… अन् प्रीतमच्या चेहेऱ्यावर उमटले हास्य
▪️रत्नागिरी
सर्वसामान्य आणि धडधाकट माणूस कुठेही, कधीही फिरायला जाऊ शकतो. त्याला कसले बंधन नसते. त्यामुळे ते नेहमीच पर्यटन, समुद्रकिनारा किंवा डोंगरदऱ्यांतून फिरत असतात. परंतु हा अनुभव दिव्यांग व्यक्तींना फारसा घेता येत नाही. त्यांना टीव्ही, मोबाईलवर शुटिंग पाहून किंवा छायाचित्रे पाहून हा आनंद घ्यावा लागतो. मात्र उंच डोंगरावरून दिसणारा अथांग समुद्र, वारा आणि निळे आकाश पाहण्याचे सरप्राईज गिफ्ट रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने प्रितम उदय कदम या सदस्याला वाढदिवशी दिले.
कशेळीच्या देवघळ पॉईंटवर व्हिलचेअरवरून पायऱ्या उतरून नेले. त्याला नेताना हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांची थोडीशी दमछाक झाली पण या पॉईंटवर पोहोचल्यावर प्रितमच्या चेहेऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे पाहून त्याच्या मित्रांना अत्यानंद झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रीतम कदम याच्या मेंदूवर दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली. कमरेखाली अधू असला तरीही व्हिलचेअरमुळे तो फिरतो. सेरेब्रल पाल्सी आजारामुळे वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्रास सुरू झाला. प्रितमने दहावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले. सुरवातीला घरातच बसून असणाऱ्या प्रीतमला रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचे अध्यक्ष सादिकभाई नाकाडे यांनी त्याला स्वावलंबी होण्यासाठी मदत केली. त्याचा आत्मविश्वास वाढला. आता प्रीतम पानपट्टी चालवतो. आजारपणामुळे प्रीतम कुठेही पर्यटना जाऊ शकला नाही. ही खंत कळल्यानंतर रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्याला वाढदिवशी आगळी भेट देण्याचे ठरवले.
अथांग समुद्र, किनाऱ्यावर येताना फेसाळणाऱ्या लाटा आणि त्याचे विराट रूप पाहताना माणसाच्या मनाला आनंद मिळतो. त्यामुळे प्रीतमला समुद्रावर न्यायचे ठरले. परंतु जवळच्या किनाऱ्यावर जाण्यापेक्षा कशेळी (ता. राजापूर) येथील देवघळी पॉईंटवर न्यायचा निर्णय घेतला. पण येथे असलेल्या सुमारे १०० पायऱ्यांवरून व्हिलचेअरवरून खाली न्यायचे आणि पुन्हा वर आणायचे हे एक दिव्यच होते. परंतु नेहमी मदतीला धावून जाणारे सादिकभाईंचे भाऊ समीर नाकाडे यांनी ही जबाबदारी पार पाडली. प्रीतमसोबत प्रिया बेर्डे, कशेळीतील तेजस फोडकर, त्याचा मित्र श्रीपाद पाटील असे मदतीला होते.
देवघळ पॉईंटवरून दिसणारे विलोभनीय दृश्य प्रीतमने आपल्या डोळ्यास साठवून घेतले. दोन्ही बाजूला डोंगरदऱ्या आणि मधल्या भागातील समुद्र व हे सृष्टीसौंदर्य पाहण्यासाठी कशेळी ग्रामपंचायतीने केलेल्या सुविधेमुळे प्रीतम हा आनंद घेऊ शकला. दिव्यांगांकरिता नेहमीच कार्यरत आणि त्यांच्या चेहेऱ्यावर आनंद राहण्यासाठी नेहमीच मदत करणाऱ्या रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने असे अनेकविध उपक्रम राबवले जात आहेत.