
पावसाळा आला तरी गोठे बांधण्यास अनुदान नाही; गोठे बांधण्यासाठी मिळणारे अनुदान अडकले लालफितीत
देवरूख : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत पाळीव जनावरांसाठी गोठे बांधण्यासाठी शासनाकडून रु. 70,000 हजाराचे अनुदान मिळत असते. त्यासाठी तालुक्यातून प्रस्ताव मागवण्यात आले होते. तालुक्यातून शेकडो प्रस्ताव पाठवून दोन महिने झाले तरी एकाही प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. लाभार्थ्याने चौकशी केली त्यावेळी मार्च अखेरपर्यंत अनुदान खात्यावर जमा होईल, असे सांगितले होते. मात्र अद्याप अनुदान न मिळाल्याने पाळीव जनावरे बांधायची कोठे? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शासनाच्या भरोशावर न राहता कर्ज काढून गोठे बांधले असते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तालुक्यातून जवळपास शेकडो प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाले आहेत. मात्र अद्याप एकही प्रकरण पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे येत्या पावसाळ्यात पाळीव जनावरे पंचायत समितीच्या आवारात बांधण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.