खेड पोलीस स्थानकाच्या हद्दीत ठिकाणी दोन अपघात एकजण ठार तरतीन प्रवाशी गंभीर
खेड दि ३ (सा वा ) मुंबई गोवा महामार्गावरील उधळे गवानजीक झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एकजण ठार तर तीन प्रवाशी गंभीर जखमी झाले. खासगी आराम बस चालकाला झोप अनावर झाल्याने बसने बोलेरो पिकअप व्हॅनला धडक दिली. त्यानंतर ती बोलेरो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टँकरवर मागून जाऊन आदळली. या अपघातात बसमधून प्रवास करणारा एक प्रवासी ठार तर बसमधील अन्य तीन प्रवाशी गंभीर जखमी झाले. जखमींना नजीकच्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरा अपघात लवेल आणि आवाशी गावांदरम्यान घडला. मालवाहुन टेम्पो चालकालाही झोप अनावर झाल्याने टेम्पो रस्ता सोडून खोल खड्ड्यात पलटी झाला या अपघातातही चालक जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विरार येथून प्रवाशी घेऊन लांजा येथे जाण्यासाठी निघालेली खासगी आराम बस पहाटे ३. ३० कशेडी घाट उतरून महामार्गावरील उधळे गावानजीक आली. या दरम्यान चालकाला झोप अनावरण झाल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बसची पुढे असलेल्या बोलेरो पिकअप व्हॅनला जोरदार धडक बसली. पिकअप व्हॅन ला मागून धडक बसल्याने पिकअप चालकाचाही गाडीवरील ताबा सुटला आणि पिकअप व्हॅन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टँकरवर जाऊन आदळली. या अपघातात पिकअप व्हॅनचा बोनेट टँकरच्या चेसीखाली घुसला.
भरधाव वेगातील खासगी आराम बसने जेव्हा पिकअप व्हॅनला धडक दिली तेव्हा बसमधील प्रवाशी साखरझोपेत होते. अचानक जोराचा गचका बसल्याने प्रवाशी सीटच्या लोखंडी बारवर आदळले त्यामुळे एका प्रवाशाच्या डोक्याला मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला तर बसमधील आणखी तीन प्रवाशी गंभीर जखमी झाले. बोलेरो पिकअप चालकाचे केवळ दैव बलवत्तर म्हणून तो या जीवघेण्या अपघातातून बचावला.
अपघाताच्या वेळी झालेला जोराचा आवाज आणि पाठोपाठ प्रवाशांचा कोलाहल कानी पडताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी महामार्गावर धाव घेत मदतकार्याला सुरवात केली. दरम्यान पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. महामार्ग पोलीस आणि खेड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पहाटेच्या काळोख असल्याने बचत कार्यामध्ये व्यत्यय येत होता मात्र तरीही पोलीस आणि ग्रामस्थांनी जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर कडून उपचारांसाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशाचे नाव उशिरापर्यंत समजे नव्हते पोलीस त्या दृष्टीने तापास करत आहेत.गेल्या काही दिवसांपासून महामार्गावर पुन्हा अपघातांची मालिका सुरु झाली असल्याने महामार्गावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे.
दरम्यान दुसरा अपघात लवेल आणि आवाशी गावांच्या दरम्यान लवेल नजीक घडला. या अपघातात झोपेत चालकाचा मालवाहू टेम्पोवरील ताबा सुटला आणि तो टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात पलटी झाला. या अपघातात देखील चालक जखमी झाला आहे. खेड पोलिसांनी अपघातग्रस्त खासगी बस चालकाला ताब्यात घेतले असून दोन्ही अपघातांची पोलिसात नोंद करण्यात आली आहे.