मिर्या-नागपूर हायवेच्या डागडुजीला मंगळवारनंतर सुरूवात
रत्नागिरी : मिर्या-नागपूर हायवेच्या कामाला मंगळवारनंतर काही दिवसांत सुरूवात केली जाणार आहे. कोल्हापूरपर्यंत महामार्गाच्या डागडुजीच्या कामाला सुरुवात होणार आहे. आंबा घाटाकडे यावर्षी अधिक लक्ष दिले जाणार आहे. महामार्गाचे काम खर्या अर्थाने तीन ते चार महिन्यांनी सुरू होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतरच या महामार्गाच्या कोकणातील टप्प्याला गती येणार असल्याचे चित्र आहे. सध्या कोल्हापूर महामार्गावर ठिकठिकाणी दुरुस्तीच्या दृष्टीने कामे हाती घेतली जाणार असून मंगळवारनंतर या कामाला सुरुवात होणार आहे. गतवर्षी आंबा घाटात दरड कोसळल्याने महामार्ग बंद पडला होता. त्यानंतर डागडुजी करण्यात आली. यावेळीही पावसाळ्यापूर्वी आंबा घाटाची पाहणी करून त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष दिले जाणार आहे. खड्डे बुजवणे, साईडपट्ट्या यांचेही काम हाती घेतले जाणार आहे. ‘मुंबई-गोवा’प्रमाणेच ‘मिर्या-नागपूर’ महामार्गाच्या कामाला कोकण पट्ट्यात फार वेग घेतलेला नाही. यासाठी आवश्यक भूसंपादन करण्यात आले असून, काही गावातील जमीनमालकांचा परतावाही देण्यात आला आहे. आणखी सुमारे साडेचारशे कोटी निधीची परताव्यासाठी आवश्यकता असून त्यातील शंभर कोटी रुपये नुकतेच महामार्ग विभागाने रत्नागिरी प्रांताधिकार्यांकडे वर्ग केले आहेत. परतावा वाटपाच्या कामाला सुरुवात झाली आहे.