दोन बळी जाऊनही पाटगाव घाटातील डांबरीकरण रखडले; माजी उपसभापती अजित गवाणकर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ बसणार 1 पासून उपोषणाला

देवरूख :

तळेकांटे-देवरूख मार्गाचे डांबरीकरण पाटगाव घाटात रखडले आहे. येथे खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून अनेकांचे बळी जात आहेत. आजपर्यंत दोघांना या खड्ड्यांमुळे जीव गमवावा लागला आहे. अनेकजण अपघातात जखमी झाले असून वाहनांचेही नुकसान होत आहे. असे असूनही पाटगाव घाटातील रस्त्याचे काम मात्र पूर्ण होत नाही. सुरू केलेले काम पुन्हा बंद करण्यात आले आहे. त्यामुळे याविरोधात संगमेश्‍वर पंचायत समितीचे माजी उपसभापती अजित गवाणकर हे 1 मे पासून उपोषणाला बसणार आहेत.
पाटगाव घाटात रखडलेल्या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे, अशी  मागणी त्यांनी केली आहे. रस्त्यासाठी रॉयल्टी न भरता उत्खनन करण्यात आले आहे. तक्रारीनंतर एका ठेकेदाराला माती उत्खननासाठी दंडही आकारण्यात आला आहे. रस्त्यासाठी लागणारी खडी 35 हजार ब्रास आहे. मात्र त्यासाठी भरलेली रॉयल्टी 5 हजार 500 रूपये इतकीच आहे. ही माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. त्यामुळे 35 हजार ब्रास खडीला 5 हजार 500 इतकीच रॉयल्टी कशी? असा सवाल निवेदनात करून चौकशी व्हावी, अशी मागणी गवाणकर यांनी केली आहे.
माळवाशीतील तरुणाचा पाटगाव घाटाच्या पायथ्याशी गेल्यावर्षी खड्ड्यांमुळे अपघाती मृत्यू झाला. दोन महिन्यांपूर्वी ट्रॅक्टरचा अपघात होऊन पाटगाव घाटात कामगाराचा मृत्यू झाला होता.  इतके बळी जाऊनही काम का रखडवले जात आहे? असा सवाल व्यक्त करत या घाटात आपलाही अपघात झाला असल्याने उपोषणाचा निर्णय घेण्यात आल्याचे गवाणकर यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी येथील काम सुरू करण्यात आले होते. साईडपट्टीवर खडीही टाकण्यात आली होती. मात्र पुन्हा हे काम बंद करण्यात आले आहे. येथील काम बंद करण्यात कोणाचा हात आहे? हे जनतेसमोर स्पष्ट व्हावे. काम सुरू करण्यासाठी अजून कितीजणांचे बळी हवे आहेत? असा सवाल निवेदनातून करत देवरूख येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याबाबतचे निवेदन त्यांनी विविध विभागांना दिले आहे. तालुका प्रशासनाने गवाणकर यांना चर्चेसाठी बोलावले होते. मात्र कार्यवाही होत नसल्याने गवाणकर उपोषणावर ठाम राहिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button