रत्नागिरीत तटरक्षक दलाच्या ८५० स्क्वाड्रनची पुनर्स्थापना
रत्नागिरी : पश्चिम किनारपट्टीवरील सागरी सुरक्षा प्रबळ व मजबूत कण्यासाठी गुजरातसारख्या तटरक्षक दलाच्या 850 स्क्वाड्रनची रत्नागिरी येथे पुनर्स्थापना करण्यात आली आहे. रत्नागिरी येथील तटरक्षक दलाच्या तळावर अॅडवान्सड लाईट हेलिकॉप्टर (एएलएच) एमके-आय आल्यामुळे सुरक्षेबरोबरच बचाव कार्यालाही गती येणार आहे. भारतीय तटरक्षक हवाई अवस्थान रत्नागिरी येथे सध्या तटरक्षक दलाच्या डॉर्नियार विमानाचे स्वतंत्र मोहिमा चालवत असून सैन्य आणि नागरी चार्टर्ड उड्डाणे सुद्धा चालवण्यात येतात. रत्नागिरी हवाई क्षेत्र हे सागरी सुरक्षेमध्ये मोक्याचे ठिकाण असून एएलएच हेलिकॉप्टर रत्नागिरीत स्थनास्त केल्याने सागरी सुरक्षा अधिक प्रबळ होणार आहे. भविष्यात तटरक्षक दलामार्फत अधिकृत मोहिमा वेगाने राबवणे शक्य होणार आहे. शोध व बचाव कार्य, प्रदूषण आवरण प्रतिसाद, आर्थिक क्षेत्राची गस्ती, समुद्री वैद्यकीय निर्वासन इत्यादी सक्षमपणे हाताळण्यास तटरक्षक दलाचा हा तळ सुसज्ज झाला आहे.