लांजा-वाडीलिंबू येथे चुलत भावाला सिलिंडरवर आपटून चालत्या गाडीतून ढकलून दिले आणि रचला अपघाताचा बनाव

रत्नागिरी : साडेतीन वर्षांपूर्वी लांजा तालुक्यातील वाडीलिंबू परिसरात घडलेल्या घटनेचा खरा प्रकार न्यायालयात समोर आला आहे. दारूच्या नशेत चुलत भावाला मारहाण करत सिलिंडरवर डोके आपटले. त्यानंतर त्याला चालत्या गाडीतून ढकलून दिले आणि जिल्हा रुग्णालयात येऊन अपघात झाल्याचा बनाव केला. पुरावेही नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अखेर न्यायालयात हा विषय गेल्यानंतर सरकारी पक्षातर्फे 14 साक्षीदार तपासण्यात आले. शेवटी चुलत भावाच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

कौस्तुभ रामचंद्र गोरे (वय 34), रोहन भागेश गोरे (वय 24, दोन्ही रा. वाडीलिंबू सापुचेतळे लांजा) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा चुलत भाऊ मनोहर महादेव गोरे ( वय 26, राहणार वाडीलिंबू सापुचेतळे, लांजा) आणि हे दोघे नात्याने एकमेकांचे चुलत भाऊ होते. 14 सप्टेंबर 2018 रोजी हे तिघेही कौस्तुभ गोरेच्या इको कारमधून (एमएच -08- आर-7132) मधून दुकानातील सामान आणि रोहन गोरेचा सिलिंडर आणण्यासाठी लांजा येथे गेले होते. सर्व सामान घेतल्यानंतर तेथीलच एका दारुच्या दुकानात दारु पिऊन ते परतत होते. ते पुनस येथे आले असता मनोहरने बियरची बाटली कौस्तुभ आणि रोहनच्या अंगावर ओतली. याचा राग आल्याने कौस्तुभने गाडीतून खाली उतरत मनोहरला मारहाण केली. त्यानंतर ते पुन्हा घरी जाण्यास निघाले. तेव्हा मनोहरने कौस्तुभने घेतलेल्या धान्याच्या पिशव्या फोडल्या. त्यामुळे राग आलेल्या कौस्तुभने मनोहरला आगवे उभर्‍याचा टोणा येथे पुन्हा गाडी थांबवून मारहाण केली. सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास आगरगाव पांढरा आंबा येथील वळणावर गाडी आली असता कौस्तुभने मनोहरला मारहाण केली. गाडीत ठेवलेल्या गॅस सिलिंडरवर त्याचे डोके जोरात आपटले. त्यामुळे मनोहरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच अवस्थेत मनोहरला चालत्या इको गाडीतून ढकलून देण्यात आले. झालेली घटना लपवण्यासाठी दोन्ही आरोपींनी अपघात झाल्याचा बनाव करून पुरावा नष्ट केला. रस्त्यात जखमी अवस्थेत पडलेल्या मनोहरला आपण जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचा बनाव त्यांनी रचला. उपचारांदरम्यान मनोहरचा मृत्यू झाला. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करून अधिक तपास लांजा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

लांजा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक विलास गावडे यांनी संशयितांवर गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे 14 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षातर्फे करण्यात आलेल्या युक्‍तिवाद ग्राह्य मानूून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दोन्ही आरोपींना मंगळवारी 7 वर्ष सश्रम कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button