सिंधुरत्न योजनेत ऐंशी टक्के सबसिडी असल्याने महिलांनी याचा लाभ घ्यावा : खासदार विनायक राऊत
सिंधुरत्न योजनेत ऐंशी टक्के सबसिडी आहे. याकरिता पहिल्या टप्प्यात दीडशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याचा लाभ घेऊन घेऊन महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहत स्वावलंबी बनावे असे आवाहन करत महागाई दिवसेंदिवस वाढत असून केंद्र सरकारला गरिबांबद्दल काहीही पडलेलं नाही, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी देवरूखमधील महिला मेळाव्यात केली. देवरूख येथील मराठा भवन येथे आयोजित संगमेश्वर तालुका शिवसेना महिला आघाडीच्या महिला मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महिला संघटकप्रमुख नेहा माने यांच्या पुढाकाराने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेच्या उपनेत्या मीना कांबळी, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार सदानंद चव्हाण, शिवसेना सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा संघटक वेदा फडके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, रचना महाडिक, माजी शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर, मिलन जुवाटकर, श्रद्धा मोरे, नीलम हेगशेट्ये, माधवी गीते, सौ. जागुष्टे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेविका आदिंसह महिला उपस्थित होत्या.
केंद्रातील सत्ताधाऱ्यांबद्दल खासदार राऊत म्हणाले, देशाचे नेतृत्व करणाऱ्यांनी संपूर्ण देशाचे हित जोपासले पाहिजे. मात्र केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारबाबत दुजाभाव करीत आहे. टॅक्सच्या रुपात राज्य सरकारला केंद्राकडून देय असलेली रक्कम दिली जात नाही. तब्बल पन्नास हजार कोटी महाराष्ट्राचे पेंडिंग आहेत. मात्र त्याबद्दल संसदेत आवाज उठवला तर सत्ताधारी काहीच बोलत नाहीत.
यावेळी मीना कांबळी म्हणाल्या, आमची महिला आघाडी पैसे देऊन आलेली नाही किंवा विकत आणलेली नाही. ती सर्व सामान्यांची आहे. ती आघाडी अशीच राहिली पाहिजे. येत्या निवडणुकांत संपूर्ण कोकण भगवेमय झाले पाहिजे, असे सांगितले. यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र माने म्हणाले, देवरूखची नगरपंचायत आपल्याला घ्यायची आहे. त्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया. सुभाष बने, सदानंद चव्हाण, विलास चाळके, राजेंद्र महाडिक यांनीही मनोगते व्यक्त केली.