गुहागर नरवण येथील आशुतोष जोशी याच्या १८ हजार ५०० किलाेमीटर पायी प्रवास करण्याच्या संकल्पाला सुरवात

गुहागर तालुक्यातील नरवण येथील आशुतोष जोशी याने नरवण ते जगन्नाथ पुरी (ओरिसा) असा १८ हजार ५०० किलाेमीटर पायी प्रवास करण्याचा संकल्प केला आहे. त्याचा प्रारंभ राम नवमीदिवशी नरवणच्या समुद्रकिनारी सूर्याला नमस्कार करून त्याने केला.आशुताेषचे आजोबा जयंत जोशी हे निवृत्त तहसीलदार आहेत. वडील अजित जोशी लोटे एमआयडीसीमधील घरडा केमिकल्समध्ये उच्च पदावर नोकरीला, आई गृहिणी, दुसरा भाऊ पुणे येथे शिक्षण घेत आहे. आशुतोषने आपले प्राथमिक, माध्यमिक शिक्षण चिपळूण तालुक्यात केले. त्यानंतर मॉडेल आॅफ आर्ट इन्स्टिट्यूट दादर येथे १ वर्ष तर भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी पुणे येथे २ वर्षांचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने इंग्लंड येथे व्हिज्युअल आर्ट्सची पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर फोटोग्राफी आणि निसर्ग संतुलन याबाबत तो स्कॉटलंड, स्पेन आणि इंग्लंडमध्ये काम करत आहे

त्याला पायी प्रवास करणे आणि गिर्यारोहणाची आवड आहे. नेपाळमधील १८ हजार फूट उंची असणाऱ्या अन्नपूर्ण सर्किट हे शिखर त्याने १७ दिवसांत पार केले आहे. पाणी टंचाई, नापीक होणारी जमीन, प्लास्टिकचा वाढता वापर, वारंवार समुद्रात निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे, वाढती उष्णता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या याबाबत जनजागृती करणे, प्रबोधन होणे यासाठी त्याने पायी प्रवासाचा मार्ग निवडला आहे. मागील ६ ते ७ वर्षे पायी चालण्याची सवय आहे. या प्रवासाची पूर्वतयारी इंग्लंडवरून भारतात आल्यानंतर गेले सहा महिने आशुतोष करत आहे.

प्रतिदिनी ३० किलोमीटरचा पायी प्रवास करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून गुहागर तालुक्यातील नरवण गावातून त्याने प्रवास सुरू केला. हा प्रवास चिपळूण, कोयना, पाटण, उंब्रज, सोलापूर, पंढरपूर, लातूर, परभणी, अकोला, अमरावती, नागपूर त्यानंतर छत्तीसगड राज्यातील रायपूरमार्गे ओरिसा राज्यातील जगन्नाथ पुरी येथे पूर्ण होणार आहे.

त्याच्या या प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी आजोबा जयंत जोशी, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. अनिल जोशी, सरपंच प्रवीण वेल्हाळ, शिवसेना युवासेना जिल्हाधिकारी सचिन जाधव, भाजपाचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, नरवणचे माजी उपसरपंच समीर देवकर, माजी सैनिक राजेश जाधव, प्रफुल्ल जाधव, संजय आरेकर, सदानंद मयेकर, आपेश जाधव, अमोघ वैद्य, राहुल ओक, ओम जोशी, श्रीकांत जोशी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button