संगमेश्वर- कसबा येथे लाल रंगात रंगला शिंपणे उत्सव

संगमेश्‍वर (कसबा) येथील देवी जाखमातेचा शिंपणे उत्सव शुक्रवारी अपूर्व उत्साहात, लाल रंगाची उधळण करीत व मटण भाकरीच्या प्रसादाचा आस्वाद घेत संपन्न झाला. या उत्सवासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातू हजारो भाविकांनी आपली हजेरी लावली होती.

शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासूनच शिंपणे उत्सवातील लाल रंगाच्या उधळणीला सुरवात झाली. दुपारनंतर यामधील उत्साह आणखी वाढत गेला. कसबा येथील चंडिका मंदिरात, संगमेश्‍वर येथील निनावी आणि जाखमाता मंदिरात तसेच फणसवणे येथील मुळ जाखमाता मंदिरातही भक्तगांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. माहेरवाशिणी व अन्य महिलावर्ग देवीची खणा – नाराळाने ओटी भरण्यासाठी मंदिरात दाखल झाल्या होत्या. दुपारनंतर सालाबादच्या रखवाली देण्यास सुरूवात झाली. यामध्ये नारळ, कोंबडे व बकर्‍यांचा समावेश होता. दरवर्षी प्रत्येक व्यक्तीची रखवाली ठरलेली असते ती या दिवशी देण्याचा प्रघात आहे.दिवसभर दिल्या जाणार्‍या रखवालीमधील नारळ, कोंबडे, बकरे यांचा मंदिराजवळच प्रसाद तयार करण्यात आला. या प्रसादामध्ये रात्री पाण्याचा हौद फोडताना दिल्या जाणार्‍या बळीचा प्रसाद एकत्र करून उशिरा हजारो भाविकांना अत्यंत शिस्तबध्द रितीने मटण – भाकरीचे वाटप करण्यात आले. शिंपणे उत्सवाला आलेला प्रत्येक भक्तगण मटण – भाकरीचा प्रसाद घेतल्याशिवाय आपल्या घरी परतत नाही हे येथील वैशिष्ट्य आहे.

कसबा व संगमेश्‍वर येथे शिंपणे उत्सवामध्ये लहान मुलांना पाण्यामध्ये डुंबण्यासाठी पाण्याचे मोठे हौद बांधण्यात आले आहेत. दिवसभर या हौदात साठविण्यात आलेल्या पाण्यात मुलं मनसोक्त डुंबत होती. मात्र यावर्षी सुरू असलेल्या परीक्षांमुळे शाळकरी मुलांचा शिंपणे उत्सवामधील सहभाग काहीसा कमी आढळला. शुक्रवारी संपन्न झालेल्या शिंपणे उत्सवामध्ये भक्त गणांचा सर्वाधिक उत्साह दिसला तो दुपारी ३ च्या दरम्यान निघणार्‍या मुख्य फेर्‍यामध्ये कसबा येथे हा फेरा गणपती मंदिर येथून तर संगमेश्‍वरमधील फेरा दोन ठिकाणांहून निघाला.

फेरा जसजसा पुढे जाईल तसतशी भक्तगणांची संख्या वाढू लागली. ढोल ताशांच्या गजरात झांज पथक व डिजे वरील गाण्यांची धुम अशा संगीताच्या साथीवर हजारो पाय थिरकायला लागले. जवळपास ४ तास हा उत्साह असाच सुरू होता. कसबा संगमेश्‍वर येथे आज घराघरातून दूर दूरहून असंख्य पाहुणे मंडळी दाखल झाली होती. प्रत्येक घरात काजुगर घातलेले मटण, वडे व भाकरी असा बेत आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे प्रत्येक घरातील सर्व सदस्य एकमेकांना नखशिखांत रंगवत होते. यामध्ये महिलांचाही समावेश मोठा सहभाग होता. एकमेकांना रंगवण्यामध्ये जावयाचा मान सर्वाधिक असतो. घरातील सर्व सदस्य जावयाला लाल रंगांनी अक्षरशः न्हाऊ घालत होते.

शिंपणे उत्सव हा देवी जाखमातेच्या स्थापनेचा व शेट्ये यांच्या सुटकेमुळे विजयाचा व शौर्याचा खेळ म्हणून गेली शेकडो वर्षे कसबा – संगमेश्‍वर येथे साजरा केला जात आहे. त्यामुळे या खेळात भक्तीभाव व आनंद या दोन्ही गुणांचा संगम पाहायला मिळतो. या उत्सवानिमित्त ग्रामदेवता जाखमाता, निनावी व कसबा येथील चंडिका मंदिरांना रंगरंगोटी करून आकर्षक सजावट करण्यात आली होती. रात्रीच्या वेळी तर दिव्यांच्या माळांनी सजलेली ही मंदिरे वातावरणातील भक्तीभाव वाढवत होती. रात्रौ १० च्या दरम्याने कसबा व संगमेश्‍वर येथील फेरा पाणी साठवलेल्या हौदाजवळ आल्यानंतर मानकरी मंडळींचा हुकूम घेऊन व त्यांना मानाचा नारळ देऊन पाण्याचा हौद फोडण्यात आला. त्यानंतर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न होऊन या वैशिष्ट्‌यपूर्ण उत्सवाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button