
राजापूर येथे ट्रकने दुचाकीस्वारांना चिरडले; दोघेजण जागीच ठार
राजपूर : भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडल्याने झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. ही घटना मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर उन्हाळे कुंभारवाडी येथे गुरूवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली.बाजीराव डोंगळे ( वय सुमारे 52, राहणार हातिवले) व विजय हरेश्वर शिंदे (वय सुमारे 45, राहणार खडपेवाडी, राजापूर) अशी मयत झालेल्यांची नावे आहेत. या अपघाताला कारणीभूत असलेल्या टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघाताची खबर मिळताच पोलिसांसह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. खासगी रूग्णवाहिकेने दोघांचेही मृतदेह राजापूर ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले असून सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती. बाजीराव डोंगळे व विजय शिंदे हे दुचाकीवरून (क्रमांक एम.एच.08, ए.बी.0277) हातिवले येथून राजापूरला येत होते. ते कुंभारवाडी येथील जितवणे धबधबा येथे आले असता समोर असणाऱ्या कंटेनरची (एम.एच.08, ए.पी.2322) बाजू घेऊन पुढे येण्याच्या प्रयत्नात असताना मागून भरधाव वेगात येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकी ट्रकच्या चाकाखाली जाऊन सुमारे 100 फुटे पुढे फरफटत गेली. यामध्ये दुचाकीवरील दोघेही ट्रकखाली चिरडले गेल्याने जागीच ठार झाले.
दुचाकीला धडक दिल्यानंतर या टेम्पोने समोरून येणाऱ्या राजापूर-तारळ या एसटी बसलाही धडक दिली. सुदैवाने एसटीतील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही.