अडूर येथे धगधगत्या होमातून धावला संकासूर
गुहागर : कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या ठिकाणी विविध प्रथा व परंपरा देखील पाहावयास मिळतात. तालुक्यातील अडूर येथेही अनोखी परंपरा जपली जात आहे. सहाव्या होळीच्या दिवशी संकासूर पेटत्या होमातून धावत पाठलाग करतो. हा क्षण पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. फाल्गुन पंचमीच्या दुसर्या दिवशी अडूर गावाची ग्रामदेवता श्री सुंकाई देवीचे खेळे भोवनीकरीता बाहेर पडतात. या अंतर्गत पाच गावे येतात. यामध्ये कोंडकारूळ, बोर्या, बुधल, पालशेत व नागझरी या गावांचा समावेश होतो. या पाच गावातील भोवनी झाल्यावर पंचमीला रात्रीच्या वेळी अडूर भाटी मैदान येथे रात्रीचे खेळ खेळले जातात. यावेळी पेटत्या होमातून धावणार्या संकासुराचा थरार पाहण्यासाठी जिल्ह्यातून अलोट गर्दी जमते. यावेळी दोन होळी पाहावयास मिळतात. यामध्ये पहिली होळी कोकड होळी ही स्थानिक पिंपळदेवाची तर दुसरी होळी ही छोटी होळी ग्रामदेवतेच्या मंदिरात मानाचे स्थान असणार्या पड्यादेवाची असते. यावेळी होळीभोवती पाच फेर्या मारून संकासुराच्या हातून होम प्रज्वलित करण्यात येतो.