वाईन पिऊन गाडी चालवली तर दंड होईल का? या प्रश्नाला मुंबई पोलिसांनी दिले भन्नाट उत्तर
वाईन ही दारू आहे की नाही? यावरून वाद रंगला आहे. त्यातच वाईन पिऊन गाडी चालवली तर दंड होईल का? असा प्रश्न एकाने मुंबई पोलिसांना विचारला. त्यावर पोलिसांनी भन्नाट उत्तर दिलं आहे.
राज्य सरकारने वाईनबाबत निर्णय घेतल्यानंतर विरोधकांनी सडकून टीका केली. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्याचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यानंतर वाईन ही दारू नाही, असा दावा राज्यातील नेत्यांनी केला आहे. आता वाईन पिऊन गाडी चालवली तर मला पोलिस पकडणार का? बार दाखवणार की तुरुंग? असा प्रश्न एका नेटकऱ्यानं विचारला. त्यावर ”आम्ही तुम्हाला जबाबदार नागरिक म्हणून मद्यपान केल्यानंतर बारमधून उठून ड्रायव्हर असलेल्या गाडीत बसण्याची शिफारस करतो. जर ब्रेथ अॅनालयाझरमध्ये तुम्ही सेवन केलेल्या वाईनमध्ये अल्कोहोलचा अंश आढळला तर तुम्हाला तुरुंगात आमचा पाहुणा म्हणून यावे लागेल,” असं उत्तर मुंबई पोलिसांनी दिलं आहे.
त्यामुळे तुम्ही मॉलमधून घ्या किंवा किराणा मालाच्या दुकानातून वाइन घ्या परंतु ट्रॅफिक विषयीचे नियम मात्र पाळावेच लागणार आहेत