
कोकणातून गुजरातकडे जाण्यासाठी आणखी एक ट्रेन सोडण्याची मागणी
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर गुजरात राज्यातील वेरावळ (सौराष्ट्र) प्रांताकडे जाण्यासाठी आठवड्यातून केवळ एकच ट्रेन असून या मार्गावर आणखी एक ट्रेन वाढवावी, अशी मागणी आता रेल्वे प्रवाशांमधून करण्यात येत आहे. याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री, राज्यमंत्र्यांसह माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व कोकण रेल्वे प्रशासनाकडे तसा पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर गुजरातकडे जाण्यासाठी काही गाड्या सुरू आहेत. यामध्ये दक्षिणेतील त्रिवेंद्रम (थिरुवनंतपुरम) एर्नाकुलम ,नागरकोइल आदी भागाकडून गुजरातमधील वेरावळ ,ओखा , हाप्पा ,गांधीधाम आदी भागांपर्यंत या गाड्या धावतात. काही गाड्या आठवड्यातून एकदा तर काही दोनदा धावतात. या गाड्यांमुळे दक्षिणेच्या एका टोकापासून ते गुजरातच्या दुसर्या टोकापर्यंत चांगला प्रवास करणे शक्य होते. त्यामुळे या गाड्यांना कायमचीच वर्दळ असते. यामध्ये गुजरातच्या सौराष्ट्र प्रांतातील वेरावळपर्यंत जाण्यासाठी आठवड्यातून केवळ एकच गाडी असून ती दर सोमवारी सकाळी त्रिवेंद्रमवरून वेरावळसाठी सुटते. गुरुवारी पहाटे वेरावळवरून त्रिवेंद्रमसाठी सुटते.
वेरावळपासून सुमारे दहा ते बारा किमीवर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असे सोमनाथ मंदिर आहे. या व्यतिरिक्त जुनागड येथील गिरनार पर्वतावर दत्त महाराजांचे जागृत स्थान आहे. याच पर्वतावर अंबाजी माता हे शक्तीपीठ असून नवनाथांपैकी एक असे गोरक्षनाथ यांचेही मंदिर आहे. वीरपूर येथे संत जलाराम बाबा यांचे मंदिर आहे. या व्यतिरिक्त संत नरसी मेहता आदींसह गोंडल येथील स्वामीनारायण मंदिर आहे.
या स्थानांकडे भाविकांचा ओढा असतो. त्यामुळे वेरावळ विभागाकडे जाणार्या एकमेव गाडीला सदैव गर्दी असते. या ट्रेनचे आरक्षण न मिळाल्यास बर्याच वेळा प्रवाशांना अर्धा-अर्धा प्रवास करावा लागतो. वेरावळ मार्गावरील एकमेव असलेल्या या ट्रेनची गर्दी पाहून कोकण रेल्वे प्रशासनाने या मार्गावर आणखी एक ट्रेन सुरू करावी, अशी मागणी आता वाढू लागली आहे.
याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णवी अश्वीन, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील, खासदार विनायक राऊत, माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासह कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे एका निवेदनाव्दारे करण्यात येणार आहे.