बोर्डाच्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ‘ग्रेस’ गुणांबाबत मोठा निर्णय!

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेवल्या आहेत. यावर्षी या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ग्रेस गुणांच्या प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला आहे. तो बदल काय आहे, कुणाला काय फायदा होणार हे बघुया. प्रतिवर्षीप्रमाणे इयत्ता १० वी व १२ वीच्या खेळाडू विद्यार्थ्यांचे ऑफलाईन अर्ज मागविले जातात. त्या माहितीचे संकलन करुन कार्यालयाद्वारे हे गुण माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत मंडळास पाठवले जाते.

सन २०२३-२४ पर्यंत ग्रेस गुण प्रक्रिया काही मानवी त्रुटीमुळे क्लिष्ट होत होती. त्याचा फटका विद्यार्थ्यांना त्यांचे गुण न मिळण्याने बसत होता. या प्रश्नावर तोडगा आणि सदर प्रक्रिया निर्दोष करण्यासाठी या वर्षीपासून ( २०२४-२५) पासून ग्रेस गुणांसाठी केली जाणारी प्रक्रिया शासनाच्या आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाईन केली. सदर पोर्टलद्वारे सर्व अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे सादर करण्याची सुविधा निर्माण करुन देण्यात आली आहे.

खेळाडू विद्यार्थी / जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी आपले सरकार ॲपद्वारे या वर्षीपासून सवलत गुणांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे. त्यासंदर्भात कोणताही खेळाडू जिल्हा क्रीडा कार्यालयास ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणार नाही व अशा प्रकारचा अर्ज कोणत्याही जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून स्वीकारला जाऊ नये. जर अशी बाब मुख्यालयाच्या निदर्शनास आली तर त्यासंदर्भात होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस संबधीत जिल्हा क्रीडा अधिकारी जबाबदार राहतील. तथापि, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारचा सवलत गुणांबाबतचा ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येवू नये व उपरोक्त विषयासंदर्भात दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. त्यानुसार खेळाडू विद्यार्थी व जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील खेळाडू विद्यार्थ्यांना सदर प्रणालीद्वारे अर्ज करण्याबाबतच अवगत करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

शालेय खेळाडूना मिळणारे ‘ग्रेस’ गुणाच्या संदर्भात राज्यात संभ्रम निर्माण झाला होता. प्रतिवर्षी हे गुण मिळण्यासाठी क्रीडा शिक्षकांना खेळाडूचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे प्रत्यक्ष जाऊन द्यावे लागत होते. परंतु या वर्षापासून प्रस्ताव ऑनलाईन पाठवण्याबाबत आदेश प्राप्त झालेले आहेत. कला विषयाबाबतचे सर्व प्रस्ताव ३१ जानेवारी २०२५ पूर्वी पाठवण्याबाबत बोर्डाचे परिपत्रक शाळाना प्राप्त झाले आहे. परंतु क्रीडा ग्रेस गुणा बाबत अजून निश्चित मुदती संदर्भात कुठलेही आदेश शाळाना प्राप्त झालेले नाही, असे काही शाळांकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button