मोडीत निघालेल्या “मोडी”ची वाढतेय गोडी..!

बाराव्या शतकापासून सुरू झालेली राज दरबारातील मोडी लिपी १९६० नंतर व्यवहारातूनही मोडीत निघाली. परंतु, याच मोडीची गोडी पुन्हा एकदा वाढत आहे. येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाच्यावतीने २० ते २९ जानेवारी या कालावधीत प्रथमच घेतलेल्या मोडी प्रशिक्षणात ८८ जणांनी सहभाग नोंदवून पूर्ण केले आहे.

महाराष्ट्रात सुमारे 12 व्या शतकापासून मोडी लिपीची सुरूवात झाली असे इतिहासकारांचे मत आहे. श्री. हेमाद्रीपंत ते या लिपीचे जनक होते. न मोडता, न थांबता अत्यंत जलद गतीने लफ्फेदारपणे झरझर लिहिल्या जाणाऱ्या लिपीस मोडी असे म्हणतात. यादव काळापासून सुरू झालेला हा प्रवास शिवकाळात बहरला होता. या लिपीचा सर्रास वापर राजदरबाराबरोबरच लोकांच्या दैनंदिन जीवनात 20 व्या शतकाच्या अखेरपर्यंत होत असे. महाराष्ट्रातील प्राथमिक शाळेत 1960 पर्यंत तिचा समावेश शिक्षणात होता. परंतु, छपाईच्या दृष्टिने तिची मर्यादा लक्षात घेवून काळाच्या ओघात ही मोडी लिपी मोडीत निघाली.

मोडी लिपीचा प्रसार आणि प्रचार शिवकाळात झाला. शिवकाळ किंवा पेशवाई काळामध्ये ज्यांचे अक्षर सुरेख असेल त्यांना चिटणीसी पदावर प्राधान्याने नोकरी दिली जात असे.

आजही शिवकाळातील व पेशवाई काळातील कागदपत्रे पाहिली तर, बहुसंख्य कागदपत्रे ही मोडी लिपीतूनच असल्याचे दिसून येते. आजही खासगी संस्था, शासकीय-निमशासकीय कार्यालये विशेषत: जिल्हाधिकारी कार्यालये, तहसिलदार कार्यालये, भूमीअभिलेख कार्यालये, नगरपालिका या ठिकाणी जुने दस्ताऐवज मोडी लिपीत आहेत. जन्म-मृत्यूची नोंद, जमिनींची कागदपत्रे यांचा समावेश यात आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेखागारातील पुणे पुरालेखागाराचे उदाहरण द्यावयाचे झाले तर या ठिकाणी पेशवे दप्तरातील १५९० पासूनचे मोडी लिपीतील अभिलेख ठेवण्यात आलेले आहेत. या पुणे लेखागाराचे वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास एका लिपीतील, एका भाषेतील, एका राजवटीतील, एका राज्याचा इतिहास माहिती सांगणारी सन १५९० ते १८६५ पर्यंत म्हणजे सुमारे २५० वर्षाची ऐतिहासिक मोडी लिपीतील कागदपत्रे इतिहास संशोधकांची प्रतिक्षा करीत आहेत.

अशा प्रकारची व मोठ्या संख्येची कागदपत्रे अन्यत्र दुसरीकडे कोठेही आढळून येत नाहीत. याशिवाय कोल्हापूर पुरालेखागार, मुंबई पुरालेखागार या ठिकाणी लाखांच्या संख्येत मोडी लिपीतील कागदपत्रे जतन करुन ठेवण्यात आलेली आहेत. मात्र आजच्या स्थितीत मोडी जाणकार किंवा मोडी लिपीतील अभिलेखांचे वाचन करणारे अत्यंत अल्प असल्याने या अभिलेखाचे वाचन होत नाही. भारतीय ऐतिहासिक अभिलेख आयोगाच्या १९७९ च्या औरंगाबाद येथील ४६ व्या अधिवेशनात मोडी लिपीच्या संवर्धनासाठी पुराभिलेख संचालनालयाचे महाराष्ट्र शासनाच्या मदतीने आवश्यक ती उपाययोजना करावी असा ठराव मंजूर केला होता. त्यानुसार पुराभिलेख संचालनालयाने मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग सुरु करण्याचे निश्चित केले. अभिलेखागारातील या कागदपत्रांचे वाचन व्हावे, इतिहास संशोधनास प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाने मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचा उपक्रम हाती घेतला. तत्कालीन सचिव संजीवनी कुट्टी यांनी या उपक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी शासनाची मान्यता मिळवून दिली.

तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही या उप्रकमास शुभाशिर्वाद देवून उत्तेजन दिले. मोडीलिपी प्रशिक्षण वर्ग सुरु करण्याचे श्रेय हे माजी संचालक डॉ. भास्कर धाटावकर यांना जाते. 3 डिसेंबर 2003 रोजी मुंबईमध्ये पहिला मोडीलिपी प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ झाला. राज्य शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाच्यावतीने मोडीचे प्रशिक्षण देण्यात येत असते. 10 दिवसांच्या या प्रशिक्षणानंतर 100 गुणांची लेखी परीक्षा होते. उत्तीर्ण होण्यासाठी कमीत-कमी 50 गुणांची आवश्यकता असून, उत्तीर्ण होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रही देण्यात येते. येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात २० ते २९ जानेवारी या कालावधीत राबविलेल्या प्रशिक्षणामध्ये ८८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मर्यादित प्रवेश असतानाही या प्रशिक्षणासाठी मोठा प्रतिसाद मिळाला. पुणे येथील सी डॅकच्यावतीने ‘मोडी लिपी शिका’ हे मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. https://cdac.in/index.aspx?id=lu_modi_script या ॲपच्या माध्यमातून अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत पध्दतीने माहिती दिली आहे.

झरझर उतरणाऱ्या मोडीशी बोरुचा फार घनिष्ठ संबंध आहे. १४ व्या शतकापासून लेखणी म्हणून वापरात येणारा हा बोरु १९७० पर्यंत प्राथमिक शाळांमध्ये वळणदार अक्षरांसाठी वापरला जात होता. चिव्याच्या..झाडांमधीलच एक छोटा गवती प्रकार म्हणजे बोरु ! तसा हा बांबूवर्गीय कुळातीलच ! याच्या खोडाला चाकूसारख्या धारदार शस्त्राने टोक बनवून दौतीत बुडवून वळणदार अक्षर काढले जायचे. विशेषतः मोडीतील सर्व दस्तावेज या बोरुनेच लिहिलेली आढळतात. कालांतराने शाईचे..निबचे पेन आले. पण, बोरुची नजाकत, अक्षरांचे सौंदर्य याच्याशी तुलना होवूच शकत नाही.

मोडी प्रशिक्षण घेतलेले काही विद्यार्थी आज स्वत:चे करिअर तर करत आहेतच. त्याशिवाय ही भाषा जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीकोनातून प्रचारकाचे कामही उत्तमरित्या पार पाडत आहेत. प्रथमच भरवलेल्या या प्रशिक्षणासाठी मिळालेला प्रतिसाद पाहून, मोडीत निघालेल्या मोडीची पुन्हा एकदा गोडी निर्माण झाली आहे, हे यावरून दिसून येते. *- प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते* *जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button