गौराईच्या आगमनाने गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित ; सुहासिनींनी केले गौराई पूजन
खेड : कोकणातील घराघरात गणराज विराजमान झाले असतानाच सोन्याच्या पावलांनी गौराईचे आगमन झाले असल्याने गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे. काल थाटात आगमन झालेल्या गौराईचे आज पूजन करण्यात आले. ग्रामीण भागात गौरी पूजनाला ओवसा असे संबोधले जाते. गौराईला ओवसने हे सुहासिनींसाठी अतिशय आनंद देणारी परंपरा मानली जाते.
कोकणात गौरी गणपती या सणाला एक वेगळेच महत्त्व आहे. या सणादरम्यान गणेशभक्तांमध्ये असलेला उत्साह शब्दात वर्णन करता येत नाही. मात्र गेली दोन वर्ष या सणावर कोरोनाचे सावट असल्याने या सणवार शासनाकडून अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोनाची भीती असल्याने गणेशोत्सव साजरा करताना गणेशभक्तांना उत्साहाला मुरड घालावी लागत असल्याने गणेशभक्तांमध्ये नाराजी आहे . मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कोरोना निर्बंधांमध्ये थोडी शिथिलता असल्याने गणेशोत्सव साजरा करताना भक्ताचा उत्साह वाढलेला पाहावयास मिळत आहे.
गणेशोत्सवात गौरी पूजनालाही अनन्यसाधारण महत्व आहे. गणरायाची माता पार्वती म्हणजेच गौरी…वर्षातून दोन दिवस गौरी माहेरी मुक्कामी येत असते. अशा या लाडक्या गौराईचे रविवारी मोठ्या उत्साहात आगमन झाले. गौराईचे विधीवत पूजन करून सुहासिनींनी तिची प्रतिष्ठापना केली.
सर्वसाधारणपणे गणपतीच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी गौरी येतात. विविध प्रांतानुसार गौरी पूजनाची प्रथा आहे. प्रांत आणि भागाप्रमाणे गौरी उत्सवाची पद्धत बदलते. कोकण असो वा इतर प्रांत असो, या भागात उत्सवाची वेगळी पद्धत पहायला मिळते. पण, महिलांच्या या सणात भक्तीभाव एकच असतो. माहेरी असलेल्या गौराईचा तितक्याच लाडाने पाहुणचार केला जातो. काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीही म्हणतात. गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना करतात. कोकणात या सणासाठी मुली माहेरी येतात.. कोकणात काही भागात फुलांच्या तर काही भागात खडय़ांच्या गौराई पुजण्याची पद्धत आहे.
कोकणातील प्रत्येक गावात गौराई पॉजनाची प्रथा आहे. काही गावांमध्ये विहिरीवरुन चिरडयांची गौराई आणली जाते तर काही भागात नदीवरून सात खडे आणून ते खडे गौराई म्हणून पुजली जाते. काही ठिकाणी मात्र गौरीचे मुखवटे सुंदर साडी, चोळीने सजवून त्यांची पूजा व आराधना केली जाते. काही गावांमध्ये लाकडी मुखवटे तर काही गावांमध्ये धातूचे मुखवटे असलेल्या गौरी पहावयास मिळतात.
दरवर्षी गौराईला साडी नेसवून अगदी देवीप्रमाणे नटवतात. महिला आपल्या गौरीचा साजशृंगार प्रेमाने करतात. गौरी पूजनात गौरीला गोडाचा तसेच काही ठिकाणी तिखटाचा नैवेद्य केला जातो. दोन दिवस माहेरी मुक्कामाला असेलेल्या गौराई पुजनाचा मान महिलांना असतो.
महिलांकडून गौराईची आराधना, गौराईची आरती, विविध गीते, गाणी म्हटली जातात
विवाहित महिला आपल्या सौभाग्याचे लेणं मागण्यासाठी आणि कुमारीका आपल्याला चांगले सौभाग्य मिळावे, यासाठी गौरी पूजनाचे व्रत करतात.5 दिवसांच्या गणपतीसोबतच गौरीचे विसर्जन केले जाते.