स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्तभाजपातर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ऍड दीपक पटवर्धन यांची माहिती
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रच्या माध्यम विभागातर्फे ‘गेल्या ७५ वर्षात देशाने काय कमावले ? काय करायचे बाकी आहे ?’ या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुली असून पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे पंचाहत्तर हजार, पन्नास हजार व पंचवीस हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येतील तसेच स्पर्धेतील निवडक निबंधांचे संकलन करून एक ग्रंथ प्रकाशित करण्यात येईल, असे भाजपा जिल्हाध्यक्ष अँड. दिपक पटवर्धन यांनी सांगितले.
मा.जिल्हाध्यक्ष दिपकजी पटवर्धन म्हणाले की, आपला देश १५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र्याची ७४ वर्षे पूर्ण करून अमृत महोत्सवी ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या ७४ वर्षात देशाने अनेक क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. त्याचबरोबर करण्यासारखे बरेच काही राहून गेले आहे. अनेक संधींचा लाभ घेतला तर अनेक संधी गमावल्या. देशाची अर्थव्यवस्था, शेती, सिंचन, शिक्षण, संरक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, सामाजिक सुधारणा अशा अनेक बाबतीत देशाची प्रगती झाली आहे पण त्याचबरोबर अनेक कामे करणे अद्यापही बाकी आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या सर्वाचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. देशासंबंधीच्या महत्त्वाच्या विषयावर अमृतमंथन घडविण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे.
त्यांनी सांगितले की, स्पर्धेसाठीचे निबंध चार हजार ते पाच हजार शब्दांचे असावेत, त्यामधील नोंदींच्या संदर्भांचा स्पष्ट उल्लेख असावा आणि निबंध संशोधनपर असावेत अशी अपेक्षा आहे. या निबंध स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातील नागरिकांनी विविध विषयांवर व्यापक वाचन करावे आणि काही निश्चित विश्लेषणात्मक भूमिकेतून लेखन करावे, अशी अपेक्षा आहे. स्पर्धेसाठीचे निबंध bjpmedia@mahabjpmedia.org या २५ नोव्हेंबरपर्यंत ई मेलने पाठवावेत. विविध क्षेत्राशी संबंधित २५ विषयांची यादी निश्चित केली असून त्या पैकी कोणत्याही एका विषयावर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या भाषेत निबंध लिहावा. प्रत्येक भाषेसाठी स्वतंत्रपणे पारितोषिकांची व्यवस्था केली आहे. विषयांची यादी आणि स्पर्धेची नियमावली प्रदेश भाजपाच्या मनोगत या ॲपवर उपलब्ध आहे. गुगल प्लेस्टोअरवरून हे ॲप डाऊनलोड करून घेता येईल. हे ॲप https://bit.ly/3fhfYRp या लिंकवरही उपलब्ध आहे.