
किंजळघर येथे दरड कोसळली, 16 व्यक्तींचे स्थलांतर
मंडणगड : तालुक्यातील किंजळघर येथे दरड कोसळली. येथील तीन घरांना धोका निर्माण झाला आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार दत्तात्रय बेर्डे यांनी घटनास्थळी भेट देत मार्गदर्शक सूचना करीत तीन घरांतील 16 व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थलांतर केले. दि. 8 जुलै रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास दरडीचा काही भाग पावसाच्या पाण्यासोबत खाली आला. सुदैवाने पावसाचा जोर ओसरला असल्याने मोठा अनर्थ टळला. याची माहिती मिळताच तहसीलदार दत्तात्रय बेर्डे, गटविकास अधिकारी सुवर्णा बागल, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सकपाळे व महसूल कर्मचारी यांच्यासह भेट दिली. परिस्थितीची पाहणी केली असता याठिकाणी तीन घरांना धोका निर्माण झाला आहे. तस्लिम अयुब ओंबिलकर, हसमत महमद शेख, तन्वीर अयुब ओंबीलकर यांच्या घरातील एकूण 16 नागरिकांना गावातीलच त्यांच्या अन्य नातेवाईकांकडे आवश्यक सामानासहित सुरक्षित स्थलांतरित करण्यात आले. त्यांना अन्नधान्य कीटही देण्यात आले आहे.