
जिल्ह्यातील 81 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा
पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली असली तरी जिल्हावासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या पाच तालुक्यातील 52 गावातील 81 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एकूण 9 हजार 424 जणांची तहान भागवली जात आहे.
जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र भौगोलिक स्थितीमुळे पावसाचे सर्व पाणी समुद्राला जाऊन मिळते. मात्र गेल्या काही वर्षापासून शासनाकडून विविध उपक्रम राबवल्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली आहे.
यावर्षी सर्वाधिक उष्म्याची नोंद झाली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पारा वर चढत गेला. यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत मोसमी पाऊस लांबला होता. त्यानंतर प्रत्येक महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. परिणामी नद्या, नाले यासह पाणी पुरवठा करणार्या स्रोतांमध्ये पुरसे पाणी होते. छोट्या वहाळांमध्येही पाणी साचून राहिल्याने किनारी भागातील विहिरींची पाणीपातळी स्थिर होती. त्यामुळे डोंगराळ भागात राहणार्या गावांमध्येच टंचाईची तिव्रता जाणवत आहे.
रत्नागिरी, राजापूर, गुहागर आणि दापोली या चार तालुक्यात एकही पाण्याचा टँकर धावलेला नाही; मात्र उर्वरित पाच तालुक्यातील 9 हजार 424 लोकांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. आतापर्यंत 3 शासकीय आणि 5 खासगी अशा आठ टँकरने 469 फेर्यांनी पाणी पुरवठा करण्यात आला आहे.