जयगड खाडीत दुसरी हाऊसबोट दाखल, पर्यटनाला मिळणार चालना.

रत्नागिरी : केरळ, काश्मीरप्रमाणे हाऊसबोटीमधून खाडी किनाऱ्यावरील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी राई भातगांव येथे हाऊसबोट दाखल झाली आहे. पाठोपाठ दुसरी हाऊसबोट जयगड खाडीमध्ये चालवली जाणार आहे. ती बोटही नुकतीच दाखल झाली असून पुढील काही दिवसात चाचणी करण्यात येणार आहे.पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि महिला बचतगटांना उत्पन्नाचे साधन मिळवून देण्याच्या उद्देशाने उमेद अंतर्गत हा हाऊसबोट प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. दुसरी बोट दोन दिवसांपूर्वी जयगड येथे दाखल झाली असून, जयगड खाडी किनारी असलेल्या कांदळवनामधील पशुपक्षी पाहणे, मासे पकडणे, सनसेट पाहणे याचा आनंद आता पर्यटकांना लुटता येणार आहे.

ही बोट वाटद प्रभाग संघाला दिली जाणार असून, या हाऊसबोटीचे काम पूर्ण करण्यासह प्रत्यक्ष चाचणी घेण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. या बोटीत आठजण प्रवास करतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. ही बोट सैतवडे, जांभारी, कासारी, आगरनरळ अशी खाडीमार्गे फिरणार आहे. पर्यटक चोवीस तास बोटीमध्ये राहतील, असे नियोजन केले जाणार आहे. त्यामुळे रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना केरळसह काश्मिरच्या धर्तीवर खाडीमध्ये फिरण्याचा आनंद घेता येणार आहे.बचत गटांना बळ देण्यासाठी सिंधु-रत्न योजनेमधून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून या ४ हाऊसबोटी खरेदी करण्यात आल्या होत्या. हाऊसबोटीचे नियोजन कसे करावयाचे याची माहिती घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील बचत गटातील महिला केरळ दौऱ्यावर गेल्या होत्या. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांची ही संकल्पना होती. पहिली हाऊसबोट राई-भातगाव येथील खाडीत दाखल झालेली आहे. त्याचे व्यवस्थापन कोतवडे प्रभागाकडे दिले गेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button