
एन्रॉन प्रकल्पासाठी केलेल्या भूसंपादनासह प्रलंबित कर प्रश्न मार्गी लागणार, बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आश्वासन
गुहागर तालुक्यातील रानवी अंजनवेलच्या माळरानावर उभारण्यात आलेल्या तत्कालीन एन्रॉन प्रकल्पासाठी संपादीत जमिनीचा प्रलंबित मोबदला व आरजीपीपीएलकडून गेल्या ३ वर्षाचा थकलेला कर तसेच एल ऍण्ड टीच्या कामात स्थानिकांना प्राधान्य या पार्श्वभूमीवर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी स्थानिकांना सोमवारी मंत्रालयात आयोजित बैठकीत आश्वासित केले असून हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे जाहीर केले. माजी आमदार डॉ. विनय नातू यांसह कंपनीचे अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्यासमवेत ही बैठक घेण्यात आली.
तालुक्यातील आरजीपीपीएल कंपनीने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला या बाबतचे अनेक विषय प्रलंबित असून गेली २५ वर्षे याचा पाठपुरावा यशवंत बाईत, विठ्ठल भालेकर, आत्माराम मोरे व त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून शासकीय दरबारी चालू होता. तसेच कंपनीने ग्रामपंचायतीला इमारत कर द्यावा, असा निकाल पंचायत समितीने दिला असतानाही कंपनीचे अधिकारी पुन्हा जिल्हा परिषदेकडे अपिलात गेले आहेत. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना मार्गदर्शक सूचना करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. तसेच कोकण एलएनजी आणि या प्रकरणाच्या भविष्यासाठी आवश्यक असणारी ब्रेक वॉटर बांधणारी कंपनी एल ऍण्ड टी या दोन्ही स्थानिकांना डावलून इतरांता रोजगार देण्याची चुकीची प्रक्रिया होत असल्याचे चव्हाण यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
www.konkantoday.com