
कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांना सेवेत रुजू करून घेण्याची मागणी
रत्नागिरी : कोकण रेल्वेने कोरोनाच्या अडीच वर्षाच्या काळात ज्या भरती प्रक्रिया राबविल्या नव्हत्या त्या राबविण्याच्या मागणीसाठी कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समिती पुन्हा एकदा सरसावली आहे. प्रकल्पग्रस्तांना वेगळा कोटा देऊन भरती खुली करून प्रकल्पग्रस्तांना सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मागणी या समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी केली आहे. प्रकल्पग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आत्मदहन किंवा रेलरोको करण्याचा इशाराही दिला.
कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समितीने यापूर्वीच जनता दरबार लावण्याची मागणी कोकण रेल्वे प्रशासनाकडे केलेली आहे. पण त्याबाबत वेळोवेळी निवेदने देऊन सुध्दा कोकण रेल्वे अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. कोरोनाच्या कालावधीत कोकण रेल्वेने ठेकेदारी पध्दतीने भरती करतानाही प्रकल्पग्रस्तांना डावलून भरती केली आहे. हा एकप्रकारे प्रकल्पग्रस्तांवर झालेला अन्याय असल्याचे संतोष चव्हाण यांनी सांगितले.
कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त यांच्या मागणीसाठी सी.बी.डी.बेलापूर येथील कोकण रेल्वे मॅनेजिंग डायरेक्टर संजय गुप्ता यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आलेली आहेत. परंतु त्याकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळण्यासाठी कृती समिती पाठपुरावा करूनसुध्दा कोकण रेल्वे अधिकारी वेळ मारून नेत आहे. याला जबाबदार कोकण रेल्वे भरती प्रक्रिया अधिकारी आहेत. या मागण्या येत्या काही दिवसात मान्य न केल्यास कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांना रेल्वेच्या ट्रॅकवर आत्मदहन किंवा रेल रोको केल्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. याला सर्वस्वी कोकण रेल्वे प्रशासन जबाबदार असेल असा कृती समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी कोकण रेल्वेला इशारा दिला आहे.