मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचा बडगा, ६७ लाख रूपये किंमतीचे विदेशी मद्याचे ६२५ खोके ट्रकसह जप्त
गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचे ६२५ खोके राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडले असून या मद्यासह ते वाहून नेणारा ट्रक असे एकूण ६७ लाख ५७ हजार रूपयांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. सायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाण पूलाखाली मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.
देशी-विदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने कठोर कारवाईचा बडगा उगारला असून राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या आदेशानुसार तसेच अंमलबजावणी व दक्षता संचालक श्रीमती उषा वर्मा, कोकण विभागाचे उपायुक्त सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या महाराष्ट्र राज्य भरारी पथकाने ही कारवाई केली. या पथकाची गोवा राज्यातील अवैध मद्य विरुद्ध या महिन्यातील तिसरी मोठी कारवाई आहे.
www.konkantoday.com