
जिल्हा रूग्णालयातील १०८ रूग्णवाहिकेच्या समस्यांना आ. राजन साळवी यांनी फोडली वाचा
रत्नागिरी ः जिल्हा शासकीय रूग्णालयातील १०८ रूग्णवाहिकांच्या तक्रारींबाबत आ. राजन साळवी यांनी जिल्हा रूग्णालयामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक व १०८ रूग्णवाहिका समन्वयक यांची भेट घेवून सद्यस्थितीबाबत चर्चा केली.
याबाबत आ. साळवी यांच्याकडे तक्रार आल्यानंतर आ. साळवी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा १०८ रूग्णवाहिका समन्वयक डॉ. वाईकर यांची भेट घेवून सद्यस्थितीमध्ये १०८ रूग्णवाहिकांबाबत होत असलेल्या तक्रारी निदर्शनास आणून त्यासंदर्भात योग्य ती दखल घेण्याच्या सूचना केल्या व यापुढे कोणत्याही रूग्णाची तक्रार येता कामा नये असे खडेबोल सुनावले.
रत्नागिरी येथून कोल्हापूरला रूग्णाला नेण्यासाठी असणारी १०८ रूग्णवाहिका ही कोल्हापूर पर्यंत न नेता आंबा किंवा मलकापूर येथपर्यंत रूग्णांना सोडते. तेथे कोल्हापूरमधील १०८ रूग्णवाहिका येईपर्यंत रूग्णाला प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे रूग्णांना त्याचा त्रास होतो. तसेच १०८ रूग्णवाहिकेचे काही चालक रूग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेत असल्याचे आ. साळवी यांनी निदर्शनास आणून दिले.