
रत्नागिरी जिल्हा बँकेच्या एटीएम व्हॅनमुळे चिपळूणमधील पूरग्रस्त जनतेला मिळाला दिलासा
रत्नागिरी जिल्ह्यामधील चिपळूण व खेड येथे अतिवृष्टीमुळे गंभीर पूरपरिस्थिती उदभवली होती. त्यामुळे चिपळूण शहरातील सर्व बँक व्यवहार ठप्प झाले आहेत. कोणत्याही बँकेचे एटीएम मशिन चालू नाहीत. अशा परिस्थितीत रत्नागिरी जिल्हा बँकेने आपली एटीएम व्हॅन चिपळूण शहरामध्ये दि. २५.०७.२०२१ पासून लोकांचे सेवेसाठी आणली आहे. सदर एटीएम व्हॅनला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. इतर बँकांची एटीएम सेवा पूर्णपणे बंद असताना रत्नागिरी जिल्हा बँकेने देऊ केलेल्या या सेवेमुळे पूरग्रस्त चिपळूणवासियांना एक आधार झाला आहे. याबल चिपळूणवासियांकडून बँकेला धन्यवाद देण्यात येत आहेत.
सदर एटीएम व्हॅन बँक गावोगावी बाजाराचे ठिकाणी नेऊन जिथे बँकेच्या शाखा नाहीत, एटीएम सेवा नाही, अशा ठिकाणी एटीएम व्हॅन पाठवून ग्राहकांना सेवा देत आहे. यामुळे ग्रामीण भागातील लोकांना बँकींग सेवा मिळत आहे. सदर एटीएम व्हॅन हा राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व रत्नागिरी जिल्हा बँकेचा संयुक्त उपक्रम आहे.
चिपळूण व खेड तालुक्यांत भयंकर पूरपरिस्थितीनंतर जिल्हाधिकारी यांनी सर्व बँका रविवार दि. २५.०७.२०२१ रोजी चालू ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार रविवारी सुट्टीच्या दिवशी जिल्हा बँकेच्या चिपळूण व खेड तालुक्यांतील सर्व शाखा ग्राहकांचे सेवेकरिता चालू ठेवल्या होत्या. याबाबतही सर्व स्तरांतून बँकेचे कौतुक होत आहे. या आपतकालीन परिस्थितीतही ग्राहकांना चांगली सेवा देता यावी यासाठी बँकेचे मा.अध्यक्ष महोदय डॉ.तानाजीराव चोरगे व मा.उपाध्यक्ष महोदय श्री. बाबाजीराव जाधव व सर्व सन्मा.संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक श्री.सुनील गुरव यांनी या उपाययोजना केल्या असून, यापुढेही चांगली सेवा देण्याचे धोरण ठरविले आहे. www.konkantoday.com