अन्यथा जनतेसाठी भाजपाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल–भाजपा नेते माजी आमदार बाळ माने यांचा इशारा

गेल्या महिनाभरात जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे, मात्र मंत्री उदय सामंत, खासदार, जिल्हा परिषद पदाधिकारी, किंवा या ठिकाणच्या नगर पालिकेचे पदाधिकारी या सर्वांचा पूर्णपणे भोंगळ कारभार सुरू आहे, त्यामुळे रत्नागिरीतील जनता त्रस्त आहे. हे सगळं वेळीच आवरलं गेलं नाही तर फार मोठा उद्रेक होईल. लवकरात लवकर या सर्व व्यवस्थेमध्ये सुधारणा होणं आवश्यक आहे. प्रशासन आणि इथल्या सत्ताधिकाऱ्यांनी गांभीर्याने या सर्व परिस्थितीचा विचार केला पाहीजे, अन्यथा जनतेसाठी भारतीय जनता पार्टीला वेगळी भूमिका घ्यावी लागेल असा इशारा माजी आमदार बाळ माने यांनी दिला आहे.
याबाबत बोलताना बाळ माने म्हणाले की, जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. मात्र जिल्ह्यातील परिस्थिती भयावह आहे. गेल्यावर्षीच्या अनुभवानंतर राज्यकर्त्यांनी शहाणं होणं आवश्यक होतं, मात्र तसं झालं नाही, त्यामुळे आज रुग्णांचे हाल रत्नागिरी शहरामध्ये चालू आहेत. यापूर्वीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ बोलडे यांना ज्याप्रकारे इथून घालविण्यात आलं, आणि त्याठिकाणी जे काही राजकारण करण्यात आलं ते सर्व रत्नागिरीकरांना माहिती आहे.
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेत काय त्रुटी आहेत, हे राज्यकर्त्यांनाही माहिती आहे, मात्र कोरोना व्यतिरिक्त सुद्धा इतर रुग्णांसाठी ज्या काही सोयीसुविधा असणं आवश्यक होत्या त्यासुद्धा झालेल्या नसल्याचं माने यावेळी म्हणाले.
दरम्यान गेल्या एक महिन्यात अतिशय बेदरकारपणे कामकाज सुरू आहे. आज या मतदारसंघाचे आमदार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत, मात्र ज्या जबाबदारीने काम करायला पाहिजे त्या जबाबदारीने ते जिल्ह्यात काम करत नाहीत, जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांना सुद्धा ते विश्वासात घेताना दिसत नाहीत. सोशल मीडियावर फक्त बातम्या सोडायच्या अशाच प्रकारे हे सगळं सुरू असल्याचं माने यावेळी म्हणाले.
दरम्यान 1 मे नंतर 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे, मात्र जिल्ह्यात त्याची नेमकी तयारी काय आहे, प्रशासनाकडे त्याचा रोडमॅप काय आहे हे आजही कोणी सांगू शकत नाही. लसीकरणासाठी करण्यात आलेलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन अनेक ज्येष्ठ नागरिकांना जमत नाही, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड होतेय, आणि यावर राज्यकर्ते म्हणून कोणाचंही लक्ष नाहीय. खरंतर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, नगराध्यक्ष, आमदार, खासदार यांनी एकत्रित बसून या सर्व विषयांचं नियोजन करणं आवश्यक होतं, मात्र पूर्णपणे यामध्ये त्यांना अपयश आलेलं आहे. नुसतं श्रेय लाटण्याचं काम सुरू असल्याची टीका माने यावेळी केली.
दरम्यान माने पुढे म्हणाले की, माझी प्रशासन आणि राज्यकर्त्यांना विनंती आहे, की कोणाला उगाच टोलवाटोलवीचं राजकारण करू नका, हे पाप आहे. आज जनता त्रस्त आहे, नाहीतर आम्हाला भविष्यात योग्य ती ताठर भूमिका घ्यावी लागेल, मग असं म्हणू नका प्रत्येक वेळी आम्ही राजकारण करतो म्हणून, असा इशारा माने यांनी यावेळी दिला. दरम्यान आमची राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करण्याची तयारी आहे, मात्र गेल्या एक महिन्यातील मंत्री उदय सामंत, खासदार, जिल्हा परिषद पदाधिकारी, किंवा या ठिकाणचे नगर पालिकेचे पदाधिकारी सर्वांचा पूर्णपणे भोंगळ कारभार सुरू आहे, त्यामुळे रत्नागिरीतील जनता त्रस्त आहे, हे सगळं वेळीच आवरलं गेलं नाही तर फार मोठा उद्रेक होईल. लवकरात लवकर या सर्व व्यवस्थेमध्ये सुधारणा होणं आवश्यक आहे. प्रशासन आणि इथल्या सत्ताधीकाऱ्यांनी गांभीर्याने या सर्व परिस्थितीचा विचार केला पाहीजे, अन्यथा लोकांसाठी भारतीय जनता पार्टीला वेगळी भूमिका घ्यावी लागेल असा इशारा बाळ माने यांनी दिला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button