
महाबॅंकेतील कर्मचाऱ्यांचा रत्नागिरी सह देशव्यापी संप यशस्वी
द्विपक्ष बोलणे पुनर्स्थापित करा, मान्यता प्राप्त संघटनेबरोबर झालेल्या करारांची काटेकोर अंमलबजावणी करा. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी त्वरित चालू करा यासह इतर मागण्यांसाठी ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने पुकारण्यात आलेला संप रत्नागिरीत यशस्वी झाला. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी रत्नागिरी शहरातील आरोग्यमंदिर येथील झोनल ऑफिस समोर महाबॅंकेतील कर्मचाऱ्यांनी उग्र निदर्शना केली.
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये लिपिक, शिपाई तसेच सफाई कर्मचारी अत्यंत अपुऱ्या प्रमाणात आहेत. सफाई कर्मचाऱ्यांचे पद बँक ऑफ महाराष्ट्रमधून रद्द करण्यात आले आहे.
आज 800 शाखांमधून शिपाई कर्मचारी नाहीत, 300 शाखांमधून लिपिकच नाही तर बाराशेच्या आसपास शाखांमध्ये केवळ एकच लिपिक काम करत आहे. इतक्या अपुरे आणि तुटपुंजे कर्मचारी असलेल्या शाखांमधून काम करत असते वेळी कामाचा ताण प्रचंड वाढलाय. कर्मचाऱ्यांना रजा घेता येत नाही. त्यामुळे बँकेतील वाढलेला कामाचा ताण आणि खाजगी आयुष्य या मधील समतोल ढळत चालला आहे. त्याचा ग्राहक सेवेवर अनिष्ट परिणाम होतो आहे.
नित्यनेमाची काम आउट सोर्सिंग द्वारे निभावली जात आहेत. त्यामुळे बँकेच्या प्रोसिजरमध्ये तडजोड करावी लागते. त्यातून ऑपरेशनल रिस्क तसेच ऑपरेशनल फ्रॉड वाढण्याचा धोका संभवतो. या सर्वांचा बँकेच्या एकूणच परफॉर्मन्सवर अनिष्ट परिणाम होतो म्हणून पुरेशा प्रमाणात सर्व स्तरावरील नोकरी भरती केलीच पाहिजे ही प्रमुख मागणी या संपामध्ये करण्यात आली.या संपाचा निदर्शनाचे नेतृत्व राजेंद्र गडवी आणि भाग्येश खरे या संघटनेच्या प्रतिनिधींनी केली.