शिवभोजन थाळी गरजूंना मिळतेय का?–पाहणीसाठी समिती नेमण्याची भाजपची मागणी
रत्नागिरी- कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यात सर्वत्र ‘ब्रेक दि चेन’ लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने शिवभोजन थाळी मोफत देण्यात येणार आहे. मात्र या थाळीचा लाभ खरोखर गरजूंना मिळतोय का? हे पाहिले पाहिजे. कोविड सेंटर असलेल्या ठिकाणी कोरोना रुग्णांना ही थाळी देण्यात यावी. तसेच नेमकी किती जणांना थाळीचा लाभ मिळतो याची पाहणी करण्यासाठी समिती नेमावी, अशी मागणी भाजप तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक मुन्ना चवंडे आणि तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, ओंकार फडके यांनी केली आहे.
शिवभोजन थाळीचा लाभ किती जणांना मिळतोय, याची माहिती मिळाली पाहिजे. खरी माहिती जनतेसमोर येण्याकरिता एक सदस्यीय समिती नेमावी, अशी मागणी भाजपने केली आहे. यासंदर्भातील निवेदन तहसीलदारांना देणार असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात कुळकर्णी यांनी सांगितले की, शिवभोजन थाळी मोफत दिली जाणार आहे. रत्नागिरी शहरात तीन ठिकाणी ही थाळी दिली जाते. त्याकरिता 3 हजार थाळ्यांचे उद्दिष्ट आहे. परंतु 2100 जण लाभ घेतात. त्यामुळे सध्या ब्रेक दि चेनच्या काळात नेमके किती लोक लाभ घेत आहेत, हे जाहीर करावे, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करणार आहोत.
www.konkantoday.com