विकेंड लॉकडाऊन संपताच बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी
खेड : विकेंड लॉकडाऊनची मुदत संपतात खेड बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. किराणा मालाच्या दुकानाबाहेर तर ग्राहकांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या पहावयास मिळाल्या. १५ तारखेनंतर शासनाने लॉकडाऊनचे संकेत दिल असल्याने वाण सामान व भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली असल्याने कोरोनाच्या नियमांचा पुरता फज्जा उडाला.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ या दरम्यान कडक विकेंड लॉकडाऊन जाहीर केले होते. त्यामुळे गेले दोन दिवस खेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. शहरातील सारी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. आज सकाळी विकेंड लॉकडाऊन संपले आणि बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने उघडायला सुरवात केली. त्यामुळे सकाळपासूनच बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी झाल्याचे चित्र होते.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १५ तारखेनंतर कडक लॉकडाऊन होण्याचे संकेत शासनाकडून दिले गेले आहेत. या पार्श्वभुमीवर शहरातील किराणा माल आणि भाजीपाल्याच्या दुकानाबाहेर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. किराणा मालाच्या दुकानाबाहेर तर ग्राहकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्याची खबर मिळताच खेड पोलिसांची व्हॅन बाजारपेठेत दाखल झाली. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद करावीत अशा सुचना पोलिसांनी ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून केल्यानंतर ज्या दुकानदारांनी सकाळी आपली दुकाने उघडली होती त्यांनी कारवाईच्या भितीने दुकाने बंद केली.
अत्यावश्यक सेवेत मोडणारी दुकाने वगळता अन्य दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, कारवाई करण्याची वेळ आणू नये असे आवाहन खेडच्या पोलीस निरिक्षक निशा जाधव यांनी खेडच्या व्यापाऱ्यांना केले आहे.
www.konkantoday.com