रत्नागिरी पोलिसांनी राबविलेल्या आशा ऑपरेशन मोहिमेत हरवलेल्या आठ महिलांसह सोळा जणांचा शोध लागला
हरवलेली मुले आणि महिलांसाठी रत्नागिरी पोलिसांनी नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात राबविलेल्या आशा ऑपरेशन मोहिमेत हरवलेल्या आठ महिलांसह सोळा जणांचा शोध लागला.
रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी अनेक व्यक्ती हरविल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत असतात. त्यामध्ये महिला, लहान मुलांची संख्या लक्षणीय असते. रत्नागिरी जिल्ह्यात २००३ ते २०२० या सतरा वर्षांत महिला आणि हरवलेली, अपहरण झालेली १८ वर्षांखालील मुले आणि मुली हरविल्याच्या तक्रारी झाल्या. त्यापैकी १४९ महिला आणि ३५ मुले सापडली नाहीत. ही आकडेवारी लक्षात घेऊन महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी ठरविले.त्याअनुषंगाने त्यांनी नववर्षात महिला आणि बालकांची सुरक्षितता राखणे हे प्रथम उद्दिष्ट ठरविले आणि अद्याप न सापडलेल्या महिला आणि मुलांचा प्रभावीपणे शोध घेण्यासाठी नववर्षदिनापासून आशा ऑपरेशन सप्ताह ठरविला.
या सप्ताहात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येकी एक पोलीस अधिकारी, दोन महिला पोलीस अंमलदार, दोन पुरुष पोलीस अंमलदार यांचे बेपत्ता शोध पथक स्थापन करण्यात आले. या पथकाला वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. या विशेष मोहिमेत रत्नागिरी शहर, पूर्णगड, जयगड, देवरूख, चिपळूण, दापोली, खेड या पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या हरविलेल्या व्यक्तींपैकी ८ महिला, अल्पवयीन ३ मुले आणि ५ मुली अशा १६ जणांचा शोध घेण्यात या पथकांना यश मिळाले. शोधून काढलेल्या मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आशा ऑपरेशनद्वारे शोध लागलेल्या महिला आणि मुलांचा शोध घेतल्याने त्यांच्या कुटुंबीयांना नववर्षाची अविस्मरणीय भेट मिळाली आहे. आता यापुढेही हरविलेल्या महिला आणि बालकांचा शोध प्रभावीपणे घेण्यात येणार आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सुरक्षा विशेष कक्षातील पोलीस उपनिरीक्षक रेखा जाधव, तसेच स्नेहल मयेकर, छाया चौधरी, कोमल कदम, मधुरा गावडे, आदिती राऊळ, विद्या लांबोरे, सांची सावंत या सहकाऱ्यांसह रत्नागिरी शहर, पूर्णगड, जयगड, देवरूख, चिपळूण, दापोली आणि खेड या पोलीस ठाण्यांमधील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांचे सहकार्य लाभले.
www.konkantoday.com