संगमेश्वरकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका

  • संदेश जिमन
    (9819200887)

रत्नागिरी जिल्ह्यातला निसर्गसौंदर्यानं नटलेला रमणीय तालुका म्हणून संगमेश्वर ओळखले जाते. तालुक्याचे मुख्यालय संगमेश्वर गावापासून 17 किलोमीटरवरील देवरूख येथे आहे. शास्त्री नदी व सोनवी नदीच्या संगमावर वसलेल्या या संगमेश्वर गावाला आणि एकूणच जिल्ह्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. इथल्या नद्या, इथली रानं-वनं, इथली वनसंपदा, फळं-धान्य, इथली गावं, घरं, माणसं, देवालयं, पर्यटनस्थळं सारंच कोकणात आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. कर्णेश्वर, मार्लेश्वर, शृंगारपूर, सप्तेश्वर, कुबलेश्वर, टिकलेश्वर, अंत्रवली आणि उमरे अशी देवस्थानं संगमेश्वर परिसरात आहेत. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक देखील कसबा मध्ये आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आणि 196 गावांचा मुख्य राबता असलेलं संगमेश्वर हे मुंबई-गोवा महामार्गावरचं एक अतिशय मोक्याचं स्थानक आहे. नोकरी व्यवसायानिमित्त संगमेश्वरमधून शेकडो ग्रामस्थ मुंबई, ठाणे, बडोदा, वापी, पुणे पासून ते थेट परदेशी दुबईपर्यंत गेले आहेत. इथे प्रगतीच्या दृष्टीने अतिशय वाव असताना अद्यापपर्यंत, स्वातंत्र्योत्तर काळातही म्हणावा तसा विकास झालेला नाही, हे दुर्दैवानं नमूद करावेसे वाटते.
दळणवळणाच्या साधनांमध्ये वाढ झाली, प्रगती झाली, अत्याधुनिकता आली. पण, कोकणाकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. कोकणी माणसाला सदोदित गृहित धरले गेले. कोकणी माणसाला मागास ठेवण्यातच शासन, प्रशासनाला आणि सेवांना काय मिळते, हा प्रश्नच आहे. कोकणी माणूस संयमी, आनंदी, समाधानी, अल्पसंतुष्ट आहे म्हणून त्याच्यावर कायम अन्यायच करायचा का? कोकणी माणूस पेटून उठला की सत्तांच्या बुडाला जाळ लागतो, हे ऐतिहासिक सत्य आहे. पण त्याकडे कानाडोळा केला जातो. कोकणी माणसाच्या शक्तीला जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जात आहे. आजमितीस कितीतरी पर्यटनस्थळे या भागात आहेत. पण वाहतूक व्यवस्था अपुरी असल्याने पर्यटक तिकडे फिरकत नाहीत. संगमेश्वर परिसरात तर कायमस्वरूपी पर्यटनस्थळ उभे राहू शकते. इथे निसर्गसौंदर्याची मुबलकता आहे. पण स्थानिकांना रोजगार मिळेल, ते आत्मनिर्भर होतील आणि स्वावलंबी होतील, म्हणून त्यांना वाहतुकीची साधनेच पुरवायची नाहीत, असा दुष्ट डाव आखला असावा, असे वाटते.
बसपेक्षा रेल्वे ही भरवशाची, कमी खर्चाची व जास्त सुरक्षित प्रवासाची साधन आहे. पण ती रेल्वे अर्थात, कोकण रेल्वे संगमेश्वरला मात्र डावलत चालली आहे. इथे फार गाड्या थांबत नाहीत. आहेत, त्या गाड्यांची वेळ अडीनडीची आहे. मुंबईहून सावंतवाडीला आणि गोव्याला तसेच गोवा-सावंतवाडीहून मुंबईला प्रवाशांना भरभरून घेऊन येणार्‍या गाड्या संगमेश्वरला थांबवल्या जातात. ज्यांचा संगमेश्वरच्या प्रवाशांना काहीच लाभ मिळत नाही. त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्थाच नाही. तशी सोय उपलब्ध झाली तर इथल्या स्थानिकांना नक्कीच रोजगार मिळेल, पर्यटकांची संख्या वाढेल, स्थानिक उद्योग-व्यवसायांना गती येईल. परिसरात आर्थिक सुबत्ता येईल. इथला तरुण चाकरमानी होऊन गाव सोडून मुंबईला जाणार नाही. तो इथेच रोजगार मिळवून सुखी होईल. हे सगळे संगमेश्वरला कोकण रेल्वेचे थांबे वाढवले तरच शक्य होईल.
संगमेश्वर स्थानकातून संगमेश्वर, देवरुख, साखरपा, सावर्डे, आरवली आदी भागातून आलेले प्रवासी प्रवास करतात. त्यांचा प्रचंड भार या स्थानकावर पडतो. यास्तव संगमेश्वर स्थानकाचा विकास करून इथे काही महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी केली जात आहे.
गेल्या वर्षभरात करोनामुळे अवघे विश्व हताश झालेले असताना कोकणी माणूसही हतबल झाला होता. पण तो मुळातच मेहनती, आत्मविश्वासू आणि येणार्‍या संकटांवर मात करणार्‍या स्वभावाचा असल्यामुळे त्याने स्वतःला सावरले. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जनजीवन सुरळीत होत असताना कोकण रेल्वेने या स्थित्यंतराची दखल घेऊन काही उपाययोजना करणे आवश्यक होते. निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या वतीने आम्ही सातत्याने संगमेश्वर स्थानकात नेत्रावती एक्सप्रेस आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस थांबावी म्हणून मागणी करत आहोत. त्यामुळे संगमेश्वरला पर्यटकांचा ओघ वाढेल व स्थानिक रोजगारातही वाढ होईल. शिवाय जास्तीत जास्त प्रवाशांमुळे या स्थानकातून कोकण रेल्वेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळेल. ही शक्यता कोकण रेल्वे प्रशासनाच्या मात्र पचनी पडत नाही, असे वाटते. मुळातच कोकणी माणसाचा विकास व्हावा म्हणून कोकण रेल्वे सुरू करण्याचा मूळ उद्देशच आजच्या प्रशासनाला माहिती नाही, असे दिसते. आजही कोट्यवधी रुपयांचा निधी तिकीट स्वरूपात संगमेश्वर स्थानकांतून कोकण रेल्वेला महसूल म्हणून मिळतो. त्यात वाढ होईल, असे काही करूच नये का?
केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी संगमेश्वरजवळचे गोळवली हे गाव आपल्या खासदारनिधीतून दत्तक घेतले होते. पियुष गोयल यांना आम्ही विनंती करत आहोत की, या गावाचा व परिसराचा विकास व्हावा अशी आपली इच्छा असेल तर संगमेश्वर रेल्वे स्थानकात काही गाड्यांना थांबा मिळावा, या आमच्या मागणीचा आपण सकारात्मक विचार करून मार्ग काढावा. कोकणी माणसाच्या, विशेषतः संगमेश्वरवासीयांच्या सहनशीलतेचा अंत आता पाहू नये. कारण, सहन करण्याची मर्यादाही आता संपत आली आहे, हे कोकण रेल्वे प्रशासनानं ध्यानात ठेवावे.
0 0 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button