लोटे येथील महामार्ग ट्राफिक पोलीस चौकी लवकरच होणार इतिहासजमा
खेड : मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक नियंत्रित करण्याचे काम करणारी लोटे येथील वाहतुक पोलीस चौकी येत्या काही दिवसातच इतिहासजमा होणार आहे. महामार्ग चौपदरीकरणादरम्यान या चौकीवर बुलडोझर फिरवला जाणार असल्याने या वाहतुक पोलीस चौकीचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे.
मुंबई गोवा महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी वाहतुक पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. खेड तालुक्याच्या हद्दीत कशेडी आणि लोटे येथे उभारण्यात आलेल्या वाहतुक पोलीस चौक्यांचा माध्यमातून महामार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात येते. एखादा चालक अपघात करून पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर या चौकीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमुळे त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला जातो. त्यामुळे महामार्गावरील वाहतुक पोलीस चौक्या आणि तेथे कार्यरत असणाऱ्या पोलिसांची वाहन चालकाच्या मनात कायम भिती राहिलेली आहे.
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु झाले आणि रस्त्यालगत असलेल्या पोलीस चौक्यांवर बुलडोझर फिरला. गतवर्षी भरणे नाका येथे असलेली ब्रिटीशकालीन पोलीस चौकी जमीनदोस्त करण्यात आली होती. भरणे नाका येथील ती पोलीस चौकी आणि त्या चौकीत दिवस-रात्र बसलेला पोलीस कर्मचारी महामार्गावरील गुन्हेगारीवर बारीक लक्ष ठेवून असे. भरणे नाका येथील त्या चौकीमुळे महामार्गारून जाणाऱ्या काही गुन्हेगारांना ताब्यात घेणे पोलिसांना शक्य झाले होते.
भरणे येथील ब्रिटीशकालीन चौकीनंतर आता लोटे येथील वाहतुक पोलीस चौकीचा नंबर आहे. या परिसरात सध्या सपाटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या कामादरम्यान रस्त्यालगत असलेल्या या चौकीवरही बुलडोझर फिरवला जाणार असल्याने भरणे पाठोपाठ आता लोटे येथे वाहतुक पोलीस चौकी इतिहास जमा होणार आहे.
www.konkantoday.com