दक्षिण भाजपा “विधी आघाडी ॲक्शन मोड” ला, सब रजिस्टर कार्यालयांची अवस्था सुधारण्याची मागणी करणारे निवेदन.
रत्नागिरी जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये ही जनतेची ये-जा असलेली शासनाला सर्वात जास्त रेव्हिन्यू देणारी कार्यालये आहेत. मात्र अपुऱ्या जागेमुळे सर्वच दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची, वकील वर्गाची गैरसोय होते. बसण्यासाठी धड जागा नसते. आसन व्यवस्था नसते. वृद्ध नागरिक, महिला यांना आसन व्यवस्था, स्वच्छतागृह सुविधा नसल्याने खूप अडचणींना सामोरे जावे लागते.
विस्कळीत नोंदी
“मिळकतींचा सर्च” या कार्यालयातील नोंदींच्या माध्यमातून घेणे आवश्यक असते. मात्र नोंदी असलेली २००१ पूर्वीची अनेक रजिस्टर गहाळ झालेली, जीर्ण झालेली असल्याने सर्च योग्य पद्धतीने घेणे दुरापास्त होते. सर्च घेण्यासाठी, वकिलांना बसण्यासाठी सुयोग्य सुविधा या कार्यालयात उपलब्ध नसते.
बंद पडणारे सर्व्हर
सब रजिस्टर कार्यालयात सध्या ऑनलाईन कार्यप्रणाली सुरू आहे. मात्र अनेक वेळा दोन-दोन तास सर्वर बंद असतो. त्यामुळे दस्तऐवज नोंदणीसाठी भरपूर वेळ लागतो व नागरिकांचे, वकिलांचे हाल होतात.
अपुरे कर्मचारी
सब रजिस्टर कार्यालयात बहुतेक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करतात. या कार्यालयात पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे.
असुरक्षित साइटवरून पेमेंट
आय. जी. आर च्या वेबसाईटच्या सर्टिफिकेटची मुदत संपताच तिचे तातडीने नूतनीकरण केले जात नाही. त्यामुळे अनेक वेळा अनसिक्युअर्ड साइटवरून व्यवहार करावे लागतात आणि हे धोकादायक ठरू शकते.
अस्पष्ट स्कॅन कॉपी
नोंदणीकृत दस्तऐवजची स्कॅन कॉपी अस्पष्ट असणे, नोंदणी होताच तात्काळ स्कॅन कॉपी प्राप्त न होणे, ऑनलाईन सर्च डिफेक्टिव्ह असणे असे अनेक मुद्दे भाजपा दक्षिण रत्नागिरीने उपस्थित करुन निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटींची दखल घ्यावी व सब रजिस्टर कार्यालयाची व्यवस्था, साधन पद्धती यामध्ये सुधारणा व्हावी अशी मागणी निवेदनाचे माध्यमातून करण्यात आली आहे.
या कार्यालयात आलेल्या नागरिकांना, वकीलांना बसण्यासाठी प्रशस्त जागा, स्वच्छतागृहाची सोय, सर्च संबंधित नोंदी व्यवस्थित करणे, सर्व्हर संबंधातील अडचणी दूर करणे, स्कॅन कॉपी योग्य व तात्काळ उपलब्ध होऊन मिळणे, मुदत संपताच वेबसाईटचे दाखला नूतनीकरण करणे अशा अनेक मागण्या करणारे निवेदन भाजपाने देऊन जिल्हाधिकारी महोदय यांचे लक्ष वेधले आहे.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, ॲड. बाबासाहेब परुळेकर, ॲड. अशोक कदम, ॲड. महेंद्र मांडवकर, ॲड. विजय साखळकर यांचे सह ५३ वकिलांच्या स्वाक्षर्या आहेत.
www.konkantoday.com