शासन खंबीरपणे जनते सोबत, लवकरच कोरोनावर मात करू पालकमंत्री ॲङ अनिल परब
रत्नागिरी दि.15 : रत्नागिरी जिल्हयात कोरोना पाठोपाठ निसर्ग चक्रीवादळ आलं. या आपत्तीच्या स्थितीत शासन खंबीरपणे उभं आहे आणि या संकटावर मात करुन जिल्हा नव्याने उभा करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी आज येथे केले.
स्वातंत्र्यचा 73 वा वर्धापन दिन आज होता. या निमित्ताने जिल्हयातील मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री ॲङ परब यांच्या हस्ते येथील पोलीस कवायत मैदानावर पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी इन्दूमती जाकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सोहळयास जि.प. अध्यक्ष रोहण बने, सभापती बाबू म्हाप, नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंडयाशेट साळवी तसेच जि.प. सदस्य आणि नगरसेवकांचीही उपस्थिती होती.
लॉकडाऊनच्या काळात शासनाने वेगळया बदलांसह गरीब जनतेला धान्य पुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडली आणि शासन खंबीरपणे सर्वांच्या पाठीशी आहे हे दाखवले असे ॲङ परब म्हणाले.
निसर्ग चक्रीवादळाच्या काळात नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करण्यापासून सर्व उपाय योजना जिल्हा प्रशासनाने केले व यात प्राणहानी होऊ नये याची खबरदारी घेतली याबद्दल मी प्रशासन तसेच त्याला सहकार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे विशेष अभिनंदन करतो असे सांगून ते म्हणाले की या चक्रीवादळात बाधित झालेल्यांसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आरंभीच 100 कोटी जाहिर केले होते.
आपत्ती प्राधिकरणाचे नियम बदलून अधिकाधिक बाधितांना आर्थिक भरपाई मिळावी यासाठी शासनाने मदतीचे निकष बदलले तसेच झाडनिहाय भरपाईचेही धोरण अंगिकारले. जिल्हयात आतापर्यंत 116.98 कोटी रुपये बाधितांसाठी आले आहेत. त्यातील 77.35 कोटी रुपये मदत स्वरुपात देण्यात आले सून अतिरिक्त 71.88 कोटी ची मागणी देखील शासनाच्या विचाराधीन आहे व ती देण्याची शासनाची भूमिका आहे.
याच काळात आपण कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करीत आहोत. यात सहकार्य करणाऱ्या व झोकून देऊन काम करणाऱ्या कोरोना योध्दांचे मी अभिनंदन करतो आणि शासनातर्फे आभार मानतो असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.
कोरोना काळात येणारा गणेशोत्सव आणि येणारे चाकरमानी यांचा विचार करुन अनेक बाबी शासनाने केल्या आहेत. सर्वांनी सुरक्षित अंतर राखणे, मास्कचा वापर या नियमांचे पालन करुन उत्सव आरोग्य शिबीर व उपक्रमांनी साजरा करावा असे आवाहन करताना ते म्हणाले की सर्वांच्या सहकार्यातून गणरायाच्या कृपेने आपण या संकटावर मात करु.
आत्मनिर्भर भारताचा विचार सर्वांनी केला पाहिजे, असे सांगून ते म्हणाले की निसर्गाने रत्नागिरीला सुंदर अशा सागरकिनाऱ्यांची देणगी दिली आहे. येणाऱ्या काळात गणपतीपुळे, आरे-वारे येथे स्थानिकाना संधी निर्माण करुन देण्याचे काम पर्यटन विभाग आणि एम.टी.डी.सी च्या माध्यमातून या सुविधा येथे निर्माण केल्या जातील.
आरंभी ध्वजारोहण झाले त्यावेळी पावसाची जोरदार सर आली होती. त्या मुसळधार पावसातही ध्वजारोहण झाले. यानंतर पालकमंत्र्यांना पोलीस दलातर्फे गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी कोरोनाच्या बाबतीत उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामपंचायतींचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
www.konkantoday.com