
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना राज्य सरकारने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात- चंद्रकांत पाटील
यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. हजारो चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी आतूर आहेत. मात्र, त्यांची अडवणूक होत आहे. त्यामुळे योग्य त्या उपाययोजना करुन चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ दिलं पाहिजे.’ अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
पाटील म्हणाले की, ‘लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात लाखो परप्रांतीय मजूर पायी आपल्या गावी जात असताना, त्यांना गावी परतण्यासाठी रेल्वेची व्यवस्था केली होती. तर राज्य सरकारने परिवहन महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देऊन, राज्याच्या सीमांपर्यंत या सर्व मजुरांना सोडण्यात आले.तशाच प्रकारे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना राज्य सरकारने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.’
‘गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणातील आपल्या गावी जाण्यासाठी आतूर झाले आहेत. पण प्रशासन कोरोना संकटाची भीती घालून आडकाठी करत आहे. चाकरमान्यांना क्वॉरंटाईन राहण्याची बंधनं घातली जात आहेत. पण त्याऐवजी चाकरमान्यांची मुंबईत तपासणी करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर, तो जर निगेटिव्ह असल्यास त्यांना कोकणात जाऊ देण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. जेणेकरुन हे सर्वजण अतिशय भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करु शकतील.’
www.konkantoday.com