
लोटेमधील कारखान्यांच्या कालबाह्य यंत्रांचे ऑडिट व्हावे ज्येष्ठ माध्यम सल्लागार जयु भाटकर यांची मागणी
रत्नागिरी/- लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रात कारखान्यांमध्ये होणाऱ्या दुर्घटना वाढतच आहेत. आज सकाळीही तेथे ‘समर्थ केमिकल्स’ या कारखान्यात स्फोट होऊन तीन कामगारांचा मृत्यू झाला. ‘घरडा केमिकल्स’ या प्रसिद्ध कारखान्यातील सहा जणांचा बळी घेणाऱ्या स्फोटाला एक महिना पूर्ण होण्याच्या आतच ही दुर्घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर लोटे औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांतील यंत्रसामग्रीची तपासणी करावी अशी मागणी ज्येष्ठ माध्यम सल्लागार आणि ‘मुंबई दूरदर्शन’चे माजी सहाय्यक संचालक जयु भाटकर यांनी केली आहे.
कोकणातील मोठे औद्योगिक क्षेत्र असणाऱ्या लोटे वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक कारखाने आहेत. १९७८च्या सुमारास या औद्योगिक वसाहतीच्या उभारणीची प्रक्रिया सुरू झाली. रायगड जिल्ह्यातील महाड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे तसेच गाणे खडपोली या तीन औद्योगिक वसाहती रासायनिक कारखान्यांची केंद्रे म्हणून ओळखल्या जातात. या कारखान्यांमध्ये कोकणातील शेकडो युवकांना रोजगार मिळाला हे खरे असले तरी प्रदूषण, घातक रसायने बाहेर टाकण्याचे प्रकार आणि वरचेवर होणाऱ्या आग-स्फोट या दुर्घटना यामुळे लोटे औद्योगिक वसाहत गेली अनेक वर्षे कोकणाला त्रासदायकच ठरली आहे.
या वसाहतीमधील कारखाने उभारून आता चाळीस वर्षे लोटली. त्यांतील यंत्रसामग्री जुनी झाल्याने धोकादायक बनली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यंत्रे किती काळ काम करू शकतात त्याचीही एक मर्यादा असते. त्यासाठीच लोटे क्षेत्रातील करखान्यांमधील यंत्रसामग्रीचे तातडीने ऑडिट करण्यात यावे अशी मागणी श्री. भाटकर यांनी केली. केवळ ‘फायर ऑडिट’ नको, तर कालबाह्य यंत्रसामग्री आणि उत्पादन करण्यासाठी वापरण्यात येणारी जुनाट आणि दोषपूर्ण साधने यांचीही काटेकोरपणे तपासणी होणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
वरचेवर होणाऱ्या दुर्घटना कोकणातील माणसांचा बळी घेतात. विकासाच्या अपेक्षेने आणलेल्या करखान्यांमुळे कोकणातील पर्यावरणाची हानी होते. मोठ्या प्रमाणावर रासायनिक कारखाने असूनही जिल्ह्यात औद्योगिक सुरक्षा कार्यालय नाही. यापूर्वी झालेल्या दुर्घटनांची चौकशी होऊन त्यांना जबाबदार असलेल्यांवर कारवाई कितपत झाली त्याची माहितीही स्पष्ट होणे गरजेचे आहे, असे जयु भाटकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या घटना वरचेवर का होतात त्याची चौकशी अग्निशमन क्षेत्रातील ज्येष्ठ आणि निवृत्त तज्ञांद्वारे करण्यात यावी, राज्याचे माजी अग्निशमन सल्लागार एम. व्ही. देशमुख यांच्यासारख्या तज्ञ व्यक्ती आहेत, त्यांचे मार्गदर्शन घेऊन भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी श्री. भाटकर यांनी केली. घडणाऱ्या दुर्घटनांची अग्निशमन क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ञांद्वारे चौकशी करून दोषींवर प्रसंगी संबंधित कारखाना बंद करण्यासारखी कठोर कारवाई करण्यासही मागेपुढे पाहू नये असे ते म्हणाले.
www.konkantoday.com