गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्या चाकरमान्यांसाठी एसटीची सुविधा शासनाने उपलब्ध करून देण्याची मागणी,चाकरमान्यांची लूट नकाे
पुढील महिन्यात गणेशोत्सवासाठी चाकरमानी येण्यास उत्सुक आहेत परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नियमावली करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांसाठी शासनाकडून अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपूर्वी कोकणात येणार्या चाकरमान्यांसाठी शासनाने एसटी बसची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते परंतु प्रत्यक्षात शेवटपर्यंत त्याबाबत निर्णय झाला नाही. या काळात सध्या रत्नागिरी जिल्ह्यात अडीच लाखाच्यावर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीड लाखाच्यावर चाकरमानी आले आहेत. कोरोनामुळे मुंबईत झालेल्या बिकट परिस्थितीमुळे चाकरमान्यांनी मिळेल ती वाहने घेवून कोकण गाठले होते. त्यामुळे ई पास काढण्यापासून चाकरमान्यांना भुर्दंड सोसावा लागला होता.
मुंबईत बनावट ई पास करणार्या टोळीलाही पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी चाकरमान्यांची खाजगी वाहन चालकांकडूनही लूट झाली होती. मुंबईहुन येण्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका गाडीमागे १५ ते २० हजार रुपये आकारले गेले होते. चाकरमान्यांनी जीवाच्या भीतीपोटी हा भुर्दंडही सहन केला होता. शासन जर चाकरमान्यांना आणण्याबाबत लवकर निर्णय घेणार असेल तर चारमान्यांनाही त्याचे नियोजन करणे शक्य होईल. सध्या रेल्वे वाहतूक बंद आहे ती केव्हा चालू होईल याचा भरवसा नाही. त्यामुळे शासनाने कोरोनाबाबतीत सर्व नियम पाळून चाकरमान्यांसाठी एसटीची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी चाकरमान्यांची मागणी आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर तातडीने निर्णय होणे जरूरीचे आहे.
www.konkantoday.com