
चित्रपट व नाट्यक्षेत्राला मिळणार उद्योगाचा दर्जा -मंत्री उदय सामंत
100 व्या नाट्य संमेलनाचा थाटात समारोप नाट़्यघंटा आणि नटराज प्रतिमा रत्नागिरी शाखेला हस्तांतरीत
नागपूर, 27 एप्रिल बॉलिवुड, मॉलीवुड, टॉलिवुड आणि मराठी नाट्यक्षेत्राला न्याय मिळवून देण्यासाठी व रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी उद्योगाचा दर्जा देण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांसदर्भात महाराष्ट्र दिनी, 1 मे रोजी घोषणा करण्यात येईल, अशी माहितीवजा घोषणा मराठी भाषा विभागाचे मंत्री आणि नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी केली. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाच्या समारोप प्रसंगी मंत्री उदय सामंत बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, मध्यवर्तीचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, नागपूर शाखेचे अध्यक्ष अजय पाटील, संजय रहाटे यांच्यासह सर्व शाखांचे अध्यक्ष, मध्यवर्तीचे पदाधिकारी उपस्थित होते.
उदय सामंत यांनी, शतकी नाट्य संमेलन उत्कृष्टरित्या आयोजित केल्याबद्दल नागपूर शाखेचे कौतुक केले. तसेच काही सूचनाही केल्या. मराठी भाषा केवळ दर्जा देऊन अभिजात ठरत नाही. नाट्यकर्मी, लेखक, दिग्दर्शक जे प्रयोग करतात ते अभिजातच असते. त्यांचे कर्तृत्व, त्यांची नाटके नव्या पिढीसाठी पुनर्जिवित करण्यात यावी, हा ठेवा जतन करावा, असे आवाहन त्यांनी केले. त्याचप्रमाणे नाट्य व चित्रपटक्षेत्रातील कलावंत, तंत्रज्ञ यांना रोजगार व त्यांच्यासाठी कल्याणकारी उपक्रम राबविण्यासाठी नाट्यपरिषदेने पुढाकार घ्यावा, असेही आवाहन त्यांनीकेले. आगामी काळात रंगभूमी गाजविणारे कलावंत आणि तंत्रज्ञ यांना प्रत्येकी पाच- पाच म्हणजे एकूण दहा घरे उपलब्ध करुन देण्याचा मानस शासनाचा असल्याचेही ते म्हणाले;