
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन् यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. आज विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने पुढील सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने विद्यमान मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणं आवश्यक असतं.त्यामुळेच शिंदेंनी आज सकाळी साडेअकराच्या सुमारास राजीनामा दिला. यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबरच शिंदेंच्या पक्षाचे प्रवक्ते दीपक केसरकर, मंत्री दादा भुसेही उपस्थित होते. राजीनामा दिल्यानंतर दीपक केसरकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळेस त्यांना शिंदे राजीनामा द्यावा लागल्याने नाराज आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावरही केसरकरांनी सविस्तर प्रतिक्रिया नोंदवली.
सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री शिंदे राजीनामा देतील अशी शक्यता सकाळपासूनच व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार आधी उपमुख्यमंत्री अजित पवार राजभवनात पोहोचले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवानामध्ये दाखल झाले. एकनाथ शिंदे राजभवानामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी राज्यपालांना भेटून राजीमाना सुपूर्द केला. यानंतर तिन्ही प्रमुख नेते प्रसारमाध्यमांशी संवाद न साधता निघून गेले.राजभवनाबाहेर दीपक केसरकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार संभाळण्यास राज्यपालांनी सांगितलं आहे, अशी माहिती शिंदेंच्या पक्षाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली. त्यानंतर एका पत्रकाराने शिंदे नाराज आहेत का? असा प्रश्न केसरकारांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, “बिलकूल नाराजी नाही. त्यांनी पक्षश्रेष्ठींनाही सांगितलं आहे की, ‘जो काही निर्णय आपण घ्याल तो मला मान्य असेल,’ हे स्पष्ट शब्दांमध्ये वरिष्ठ नेत्यांना कळवलं आहे,” असं उत्तर दिलं.