दोन महिने कोरोना रूग्णांसाठीच्या लढाईत लढा देणारे कोरोना योद्धा डॉ. निलेश ढेरे
गुहागर तालुक्याला कोरोनामुक्त करण्याचे स्वप्न उराशी बाळगून अहोरात्र काम करणारे डॉ. निलेश ढेरे हे कोरोनाविरूद्ध लढाई गेले दोन महिने लढत आहेत. मनुष्यबळाअभावी ग्रामीण रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभाग, कोरोना संशयितांचा स्वॅब घेणे आणि वेळणेश्वरमधील कोविड केअर सेंटरमधील रूग्णांवर उपचार करणे आदी कामांची जबाबदारी त्यांच्यावर येवून पडली आहे. ही जबाबदारी पार पडताना कुटुंबाची सुरक्षितता देखील तेवढीच महत्वाची होती. यामुळे ढेरे यांनी गेले दोन महिने गॅलरीतच राहण्याचा निर्णय घेतला व त्याची अंमलबजावणीही केली.
डॉ. निलेश ढेरे सांगतात की, सुरूवातीला घरच्यांनी विरोध केला. मुलीला आणि पत्नीला माझी गरज होती. मात्र पत्नीदेखील रूग्णसेवा करणारीच असल्याने तिने माझा निर्णय मान्य केला. मी दोन महिन्यांपासून गॅलरीत रहात आहे. चहा, नाष्टा, जेवण घेणे, झोपणे तेथेच. भर उन्हात पीपीई किटमध्ये उबणार्या शरीराला एखादी शितलता हवीशी वाटायची, मात्र कुटुंबाच्या सुरक्षेसाठी विलगीकरण आवश्यक होतं. तीन महिन्यांच्या चिमुकलीला गेल्या दोन महिन्यात स्पर्श करता आलेला नाही. तिचं हसणं, रडणं, खिदळणं लांबूनच पाहात होतो. रोज सकाळी ९ आणि सायंकाळी ६ या दोन वेळा कोविड केअर सेंटरला जाण्याच्या वेळा निश्चित केल्या होत्या. मात्र अनेकवेळा रात्रपाळी करण्याची वेळ आली अशा परिस्थितीत देखील रूग्णसेवेला महत्व देणार्या डॉ. ढेरे यांच्या कामाचे कौतुक होत आहे.
www.konkantoday.com