
आझाद मैदानातील भाजी विक्रेत्यांना मूळ जागी जाण्याची अनुमती,आझाद मैदानात आता शुकशुकाट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या भाजी, फळ व कांदा बटाटा विक्रेत्यांना प्रशासनाच्या सूचनेने पुन्हा मूळ जागी जाण्याची अनुमती प्रशासनाने दिली आहे. यामुळे आझाद मैदानाने आजजरी मोकळा श्वास घेतला असला तरी दापोली शहरातील गर्दी आता अचानक वाढणार आहे यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत पुन्हा एकदा भर पडणार आहे.
काही दिवसांपूर्वी दापोलीत कोरोनाचा प्रभाव वाढण्यास सुरुवात झाली. त्यात दापोली शहरात भाजी खरेदीचे कारण सांगून दररोज फिरायला येणाऱ्यांची संख्या देखील वाढत होती. या गर्दीवर कसे नियंत्रण मिळवावे या विवंचनेत असताना प्रशासनाने यावर उपाय शोधून काढला. दापोली शहरात मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या आझाद मैदान येथे दापोली शहरातील सर्व भाजी विक्रेते, कांदे-बटाटे विक्रेते व फळ विक्रेते यांचे काही काळासाठी आझाद मैदानात स्थलांतर करण्यात आले. सुरुवातीच्या दोन दिवशी शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा नियोजना अभावी फज्जा उडाला होता. आझाद मैदानात असणारे रणरणते ऊन,ना टॉयलेटची व्यवस्था, तेथे पाणी व वीज याचा अभाव अशा यांच्या नसलेल्या व्यवस्थेवर भाजी विक्रेत्यांनी बोट ठेवले. यानंतर प्रशासनाने आझाद मैदानाच्या बाजूला पोर्टेबल टॉयलेट तसेच भाजीविक्रेत्या करिता पाण्याची व्यवस्था व विजेची व्यवस्था देखील केली. यानंतर सर्व भाजी विक्रेत्यांनी व फळ विक्री करणाऱ्यांनी आझाद मैदानात भाजी व फळ विक्रीला सुरुवात केली. या भाजी व फळ विक्रीला वेळेचे बंधन देण्यात आलेले नव्हते. यामुळे नागरिक ज्या वेळी शक्य होईल त्यावेळी घेऊन सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करून भाजी, फळ व कांदा बटाटा खरेदी करत होते.
सध्या दापोलीत येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढली आहे. त्यात दापोली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील व एसटी स्टँड येथील पोलिस तपासणी नाके देखील बंद करण्यात आले आहेत. यामुळे दापोलीकर व चाकरमानी विनासायास दापोली शहरात फिरत आहेत. शिवाय दापोली शहरात देखील एक दिवस आड करून इतर दुकाने उघडायला परवानगी देण्यात आली आहे. रिक्षा देखील काही अटींवर सुरू करण्यात आली आहेत. यामुळे दापोलीतील नागरिकांना दापोली शहरात वस्तू घेण्यासाठी व भाजी घेण्यासाठी आजाद मैदान असा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे अखेर प्रशासनाने सर्व भाजीविक्रेते फळविक्रेते व कांदा बटाटे विक्रेते यांच्या विनंतीला मान देऊन त्यांना आपल्या मूळ जागी शहरात जाण्याच्या सूचना गुरुवारी दिल्या. यानुसार शुक्रवारपासून सर्व जण आपापल्या मूळ जागी रवाना झाले.
यामुळे आता आझाद मैदानाने जरी मोकळा श्वास घेतला असला तरी दापोली बाजारपेठेतील गर्दी अचानक वाढणार आहे. या गर्दीवर कसे नियंत्रण मिळवावे ही प्रशासनासमोर पुन्हा एकदा डोकेदुखी ठरणार आहे. यावर प्रशासन काय तोडगा काढते या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.