
रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलमध्ये पोषण आहारात आढळली अळी
रत्नागिरी : गुरुवारी पटवर्धन प्रशालेत जेवणात अळी आढळल्याची तक्रार प्रशालेने नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे केली. शहरातील काही शाळांमध्ये पोषण आहार नित्कृष्ट दर्जाचे आढळून आल्याची बाब पहिल्यांदा शिर्के, दामले प्रशालेत आढळल्यानंतर शिक्षण विभाग व नगर परिषदेकडून संबंधित ठेकेदार संस्थेला नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. शुक्रवारी नगर परिषद व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी येऊन पाहणी केली असता, तिसर्या दिवशी वरण चांगल्या प्रकारे नसल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण माने यांनी सांगितले. वरण अगदी पाण्यासारखे असल्याने त्याला चव नसल्याचेही त्यांनी नमूद केले असून हा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांच्याकडे देण्यात येणार आहे.
केंद्रीय किचन योजना नगर परिषद शाळांमध्ये 1 ऑगस्टपासून सुरु करण्यात आली आहे. पहिल्या दिवसापासून या योजनेत अनियमितपणा आणि अन्न नीट शिजवले जात नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे पालकांनी आता या पोषण आहाराला विरोध केला आहे. ही वस्तुस्थिती असताना सलग तिसर्या दिवशीही पोषण आहाराबाबत तक्रार झाली आहे. याबाबत संताप व्यक्त करतानाच याविषयी तक्रार नगर परिषद प्रशासनाकडे पटवर्धन प्रशालेने केली आहे.