
पुण्यात गतवर्षी 700 रुपये प्रतिडझन मिळणारा हापूस यंदा 1 हजार 800 रुपयांना उपलब्ध
पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात हापूसची आवक अवघ्या दोन हजार पेट्यांवर आली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडव्याचा सण चार दिवसांवर आला असताना हापूसची आवक मार्च महिन्याच्या नीचांकी पातळीवर पोहचली आहे.परिणामी, गतवर्षी 700 रुपये प्रतिडझन मिळणारा हापूस यंदा 1 हजार 800 रुपयांना उपलब्ध होत आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात मागील वर्षी कोकणातून 4 ते 8 डझनाच्या 5 ते 6 हजार पेटीची आवक दररोज होत होती. ती आता 1 ते 2 हजार पेट्यांपर्यंत कमी होत आहे. लांबलेला पाऊस, कमी पडलेली थंडी आणि आता वाढलेल्या तापमानामुळे आंब्याचा पहिला मोहर गळाला आहे.
परिणामी, उत्पादन घटल्याने आवक कमी होत आहे. त्यातच पाडव्यामुळे पुढील 4 ते 5 दिवस मागणी जास्त असणार आहे. त्यामुळे भाव चढेच राहण्याचा अंदाज व्यापारीवर्गाकडून व्यक्त करण्यात आला. सध्या बाजारात कच्चा मालाच्या 4 ते 6 डझनाच्या पेटीला दर्जानुसार 3 ते 5 हजार रुपये आणि 5 ते 8 डझनाच्या पेटीला दर्जानुसार 4 ते 8 हजार रुपये भाव मिळत असल्याची माहिती हापूसचे व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.