माजी आमदार बाळ माने आयोजित भाजप शहर मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद
रत्नागिरी :रत्नागिरीला स्मार्ट सिटी बनवायचे आहे. पाणी योजना भाजपचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली आहे. ती करायची आहे.
शहराचा चेहरामोहरा बदलायचा असून त्यासाठी युवकांची साथ हवी आहे, असे प्रतिपादन माजी आमदार बाळासाहेब माने यांनी केले.
निवडणुकीनंतर दिवाळी मिलन कार्यक्रम करू. प्रचाराला जाल त्या ठिकाणी लोकांच्या समस्या अडचणी टिपून घ्या. अशा सूचनाही श्री. माने यांनी केल्या
माजी आमदार बाळ माने यांनी आयोजित केलेल्या भाजप शहराच्या बैठकीला उदंड प्रतिसाद मिळाला. देवर्षीनगर येथे झालेल्या बैठकीला 300 कार्यकर्ते उपस्थित होते. व्यासपीठावर जि. प. माजी उपाध्यक्ष सतीश शेवडे, भाऊ शेटे, अमित विलणकर, बांधकाम व्यावसायिक महेंद्रशेठ जैन, दादा दळी, सुधाकर चांदोरकर, शिल्पा धुंदूर, सुजाता साळवी आणि बांधकाम उद्योजक राजेश शेट्ये उपस्थित होते.
18 ते 40 वयोगटातील कार्यकर्त्यांनी या सभेला गर्दी केल्याचे दिसून आले.
बाळासाहेब माने म्हणाले, पूर्वी कसोटी, नंतर वन डे आणि अलीकडे ट्वेन्टी -20 सामने रंगू लागले. त्याप्रमाणे आता राजकारणही बदलू लागले आहे. शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत निवडून द्यायचे आहे. पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी सर्वांचे लाडके देवेंद्रजी फडणवीस पुन्हा विराजमान होणार आहेत.
21 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विजयी करण्याचे उद्दिष्ट आपल्यासमोर आहे. ते पुढे म्हणाले की, भारताचा विचार करता काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भाजपचे आमदार, खासदार निवडून द्यायचे आहेत. कलम 370 रद्द झाले आहे, त्याचे महत्व आपण सर्वांनी समजुन घेतले पाहिजे व दुसऱ्यांना समजावून सांगितले पाहिजे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुती करण्याचा निर्णय घेतल्याने दिलेल्या उमेदवारांना निवडून दिले पाहिजे.
माझे राजकीय गुरु प्रमोद महाजन आहेत. सक्षम आहे तोच टिकून राहतो, हा मंत्र त्यांनी मला दिला आहे. काहीतरी मिळणार म्हणून आम्ही काम करतो, असे अनेकांना वाटते. कदाचित आज माझ्यावर अन्याय झाला असेल पण पक्षहीतासाठी निर्णय झाला आहे. देश माझा आहे, त्यांचा विकास करायचा आहे. ग्रामीण व शहरी भागात भिन्न स्थिती आहे. शहरात विभक्त कुटुंब पद्धती आहे. लोकसभेला चांगले मतदान झाले. मधल्या काळातील निवडणूक वेगवेगळ्या परिस्थिती मध्ये झाल्या. लोकांचे मत काय हे कळण्यासाठी अजून मीटर आलेला नाही. भाजपची सदस्य नोंदणी करा. कार्यकर्त्यांनी नेटवर्क उभे करायचे आहे, असे माने यांनी सांगितले.
श्री माने म्हणाले की, प्रतिकूल स्थितीत भाजपचा झेंडा घेतला. गेल्या 3/4 वर्षात मंडणगड ते राजापूर येथे भाजप वाढीसाठी प्रयत्न केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून अनेक नेते, पदाधिकारी भाजपमध्ये येत आहेत. पुन्हा एकदा भाजपासाठी आणि माझ्यासाठी चांगले दिवस आले आहेत.
माने पुढे म्हणाले की, शत प्रतिशत भाजप करण्यासाठी नगरसेवक, नगराध्यक्ष, जि प सदस्य, पं स सदस्य आपले हवे आहेत. त्यानंतर आमदार, खासदारसुद्धा निवडून येतील. केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. सामान्य माणूस समोर ठेवून या योजना बनवल्या आहेत.